
दसऱ्याच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरपासून 18 वर्षांखालील मुलांना आणि मुलींना रेल्वे पासआधारे लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आता हळूहळू वाढ झाली आहे. 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत 22 लाख 25 हजार 611 मासिक रेल्वे पासची विक्री झाली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे एकूण 57 ते 59 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत.
लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकलची दारे खुली होऊन जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. मध्य रेल्वेवर 11 ऑगस्ट ते 18 ऑक्टोबरपर्यंत 15 लाख 43 हजार 135 रेल्वे पासची विक्री झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवर याच काळात 6 लाख 82 हजार 476 रेल्वे पासची विक्री झाली आहे. अशी उपनगरीय लोकलवर सोमवारपर्यंत एकूण 22 लाख 25 हजार 611 रेल्वे पासची विक्री झाली आहे. त्यातच 15 ऑक्टोबरपासून 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र दाखवून रेल्वे पास विकत घेऊन लोकलने प्रवास करता येत असल्याने लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
कोरोना पूर्व काळात उपनगरीय लोकलने दररोज 75 ते 78 लाख प्रवासी प्रवास करीत असत. आता पश्चिम रेल्वेवर 25 ते 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे दररोज एकूण 57 ते 59 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. तिकीट खिडक्यांवर अजूनही तिकीट खरेदी करून प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली नसल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.






























































