चुकीचा हेअरकट पडला महागात! महिलेला द्यावी लागणार दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही वेळा सलून किंवा पार्लरमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हेअरकट करून दिला जात नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र नुकतीच एक घटना अशी घडलीय ज्यामुळे तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका महिलेचा चुकीचा हेअरकट करणे दिल्लीतील सलूनला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) सलून चालकाला संबंधित महिलेला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानभरपाई देण्यासाठी त्यांना आठ आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे.

दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सलून आहे. जिथे 2018 साली आशना रॉय नावाची मॉडेल हेअरकट करण्यासाठी गेली होती. आशना हिने अनेक बडय़ा ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. आशनाच्या सांगण्यानुसार, तिने समोरून लांब फ्लिक्स ठेवत मागून 4 इंच केस कापण्यासाठी सांगितले होते, मात्र हेअरस्टायलिशने तिने दिलेल्या सूचनांचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने केस कापले. ज्यामुळे तिला अनेक जाहिराती आणि चित्रपटांना मुकावे लागले. परिणामी आपले मोठे व्यावसायिक नुकसान झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तसेच केमिकलमुळे केसांचे कायमचे नुकसान झाल्याचा आरोपही तिने केला होता. महिला आपल्या केसांशी भावनिकदृष्टय़ा जोडलेल्या असतात. त्या आपल्या केसांची खूप काळजी घेतात, काळजीपोटी केसांवर मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च करतात असे आयोगाने या वेळी सांगितले असून आशनाला दोन महिन्यांत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.