
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना बंगळुरूमध्ये ट्रफिकचा फटका सहन करावा लागला होता. यानंतर आता
समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यानांही ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या राय यांना रस्त्यावर एक तास अडकून पडावे लागले, ज्यामुळे त्यांचे दिल्लीला जाणारे विमान चुकले.
सपा खासदार राजीव राय यांनी या संपूर्ण घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी वाहतूक नियंत्रण पोलीस ‘बेजबाबदार’ असल्याचा आरोप केला. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर राय यांनी बंगळुरू पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून त्यांच्या कॉलला उत्तर मिळाले नाही. शिवाय प्रचंड ट्राफिक जाम झाले असताना रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले.
Hon’ble @CMofKarnataka I m sorry but you have the worst traffic management, and most irresponsible, useless traffic police. They don’t even pick up phone calls, here is the SS of my attempt to speak to them , none of them picked up my call. Last one hour we are stuck at same… pic.twitter.com/GlWjJ4RgKH
— Rajeev Rai (@RajeevRai) November 30, 2025
संतापलेल्या राय यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आणि थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सुनावले. माननीय मुख्यमंत्री, मला माफ करा, पण तुमच्याकडे सर्वात खराब वाहतूक व्यवस्थापन आहे आणि तुमचे वाहतूक पोलिलही बेजबाबदार आहेत. ते फोनही उचलत नाहीत,” असे ट्विट करत त्यांनी पोलिसांना केलेल्या कॉलचे स्क्रीनशॉटही शेअर केले.
या समस्येवर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी नुकताच*19,000 कोटी रुपयांच्या भूमिगत बोगदा (Underground Tunnel Road) नेटवर्कचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या योजनेला वैज्ञानिक, शहरी नियोजन तज्ज्ञ आणि नागरिक कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे.


























































