हिंदुस्थानात हजारो वर्षांची दडपशाही अजूनही सुरूच आहे! ‘विद्रोही’चे अध्यक्ष संभाजी भगत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात हजारो वर्षांची दडपशाही अजूनही सुरू असून, सामान्य माणूस असुरक्षित झाला आहे. संसद आतून पोखरली गेली आहे. शत्रू दारात उभा असताना, त्याची उत्तरे विद्यापीठात किंवा ग्रंथांमध्ये मिळणार नाहीत. त्यासाठी जनतेत उतरून, पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल, असे आवाहन विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी केले.

साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्यावतीने आयोजित 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक डॉ. सोनाझरिया मिंझ, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, डॉ. सुहास फडतरे महाराज, किशोर जाधव, डॉ. जालिंदर घिगे, डॉ. मृणालिनी आहेर, कवी वाहरू सोनवणे उपस्थित होते.

शाहीर भगत यांनी सध्याच्या परिस्थितीवर कठोर टीका केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या सर्वांना दिसतात. मात्र, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या रोज होणाऱ्या कत्तली दिसत नाहीत. आपल्या विचारांची आणि प्रतिकांची रक्षा केली नाही, तर अस्तित्व धोक्यात येईल. या अंधारात एकत्र येऊन प्रकाश निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

सातारा आणि महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची भूमी असल्याचे सांगत, डॉ. मिंझ यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. डॉ. भारत पाटणकर यांनी शेतकरी आत्महत्या, जमिनी हिसकावल्या जाणे आणि स्वातंत्र्यावर येत असलेली गदा यावर भाष्य करताना, देश ‘ओपन जेल’ बनत चालल्याचा आरोप केला.