
कुडाळ येथील समीर साखळकर यांनी आपल्या कौशल्याचा वापर करीत अत्यंत कमी खर्चात फूट सॅनिटायझर मशीन बनवली. हा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून ही मशीन कुडाळ पोलिस ठाण्याला भेट दिली. साखळकर यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी सॅनिटायझर गरजेचे आहे. पण त्या बॉटलला वारंवार सर्वांचे हात लागणे पण तेवढेच धोक्याचे असते. त्यामुळे कुडाळच्या समीर साखळकर या प्रयोगशील संशोधक युवकाने पीव्हीसी पाईप आणि अन्य सहज उपलब्ध होणारे साहित्य वापरुन अल्प खर्चात ही पायाने वापरायची सॅनिटायझिंग मशीन बनवली. सामाजिक भान जपत त्याने ती कुडाळ पोलीस स्टेशनला भेट म्हणून दिली आहे. यावेळी कुडाळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर कोरे आणि डीवायएसपी तुषार पाटील यांनी या प्रयोगाचे कौतुक केले. यावेळी हवालदार संजय वराडकर, बंड्या सावंत, अविनाश पराडकर आदी उपस्थित होते. पोलिस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस ठाण्यात येणा-या नागरीकांना या मशिनचा उपयोग होणार आहे.
समीर साखळकर हे कुडाळमधील प्रसिद्ध उद्योजक असून यापूर्वी कुडाळ नगर पंचायतीसाठी त्यांनी अतिशय कमी खर्चात सॅनिटायझर टनेल तयार केले होते. त्याची दखल पी.आय.बी. (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) या संस्थेने घेत त्यांचे कौतुक केले होते.


























































