बंडगरवाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा, महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी, भिगवण

वाळू माफियांचा कर्दनकाळ ठरलेले इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्याने वाळू माफियांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा उजनीतील काळ्या सोन्याकडे वळविला असून नदीमधून बेसुमार वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन व पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे अनिर्बंध वाळूचा उपसा सुरू आहे.

दोन वर्षांच्या काळात इंदापूरचे सिंघम ठरलेले वाळू माफियांचे कर्दनकाळ असणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांना चाप दिला होता. अनेकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे वाळू माफियांत कधी नव्हे एवढी दहशत निर्माण झाली होती. महसूलच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याची दखल घेत दौंड तालुक्यातील वाळू उपसा करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार पाटील यांच्याकडे काही काळासाठी दौंडचाही पदभार सोपविला होता. त्यामुळे त्या ठिकाणीही अवैध वाळूचा उपसा बंद झाला होता.

मात्र श्रीकांत पाटील यांची बदली झाल्याने वाळू माफियांचे फावले आहे. पाटील यांच्या बदलीच्या विरोधात नागरीकांनी आंदोलने केली. वरिष्ठ स्तरावर निवेदने दिली. तर दुसरीकडे पाटील यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या वाळू माफियांनी उजनी काठी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. दहा दिवस झाले तरी अद्याप इंदापूरच्या महसूलचा पदभार नवनियुक्त तहसीलदार यांनी स्वीकारला नसल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे

इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात कोट्यावधी रुपयांचे काळे सोने दडलेले असून ते मिळविण्यासाठी वाळु माफियांनी पुन्हा कंबर कसली आहे. भिगवण जवळील बंडगरवाडी, कुंभारगांव या परिसरात फायबर बोटीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेला त्यांनी वाळू उपसा करण्याचा जोरदार धंदा चालविला आहे.

आठ दिवस चाललेल्या या प्रकाराने सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महसूल प्रशासन व पोलिसांनी याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केल्याने हा प्रकार वाढत आहे. त्यामुळे त्यांवर कारवाई होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.