
>> नवनाथ शिंदे
पुणे शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या आवारातून शेकडो चंदनाच्या झाडांचा बुंधा कापून चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे चंदनचोरांना नेमके कोणाचे अभय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. जिल्हा पशुवैद्यकीय आवार, एनआयबीएम परिसर, आर्म फोर्सेस मेडीकल स्टोअर, एसआरपीएफ ग्रुपसह विविध शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच चंदनाच्या झाडांची चोरी केली जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि हद्दीतील पोलिसांच्या बीट मार्शल पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. चंदनचोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
शासकीय आवार मोठ्या क्षेत्रामध्ये पसरल्यामुळे चंदनचोरांचे फावत आहे. त्याशिवाय कुचकामी सुरक्षारक्षकांची हयगय चोरट्यांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे महिन्याभरात जवळपास ५० पेक्षा जास्त चंदनाच्या झाडांची चोरी झाली. विशेषतः चोरट्यांकडून मोठा प्रशस्त असलेला शासकीय आवाराची रेकी करून चोरी केली जात आहे. चंदनचोरट्यांनी औंधमधील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाच्यामागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील १० हजार रुपये किंमतीच्या दोन चंदनाच्या झाडांचा बुंधा कापून चोरुन नेला. मागील काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरातील हवामान खात्याच्या कार्यालयातून चंदनाच्या झाडांची चोरी केली होती. त्यामुळे शासकीय कार्यालय आवारातील चंदनाच्या झाडांवर चोरट्यांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षारक्षक असतानाही मध्यवर्ती शहरातील कार्यालयाच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्यामुळे नागरिकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.
विविध शासकीय कार्यालयाच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी केली जात आहे. विशेषतः घनदाट जंगलाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी केली जात आहे. चंदन चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी वानवडीतील आर्म्ड फोर्सेस मेडीकल स्टोअर परिसरासह एसआरपीएफ ग्रुप दोनमधील ५० हजार रूपये किंमतीच्या चंदन झाडांची चोरी केली आहे. त्याशिवाय एसआरपीएफ ग्रुप दोन मधील २६ हजार रूपये किंमतीची चार चंदनाची झाडे चोरून नेली. दरम्यान, शासकीय कार्यालयाच्या आवारात रात्रपाळीला असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. चंदनचोरट्यांकडून वेधशाळेच्या सुरक्षारक्षकाला करवतीचा धाक दाखवून चंदनाची झाडे कापून नेली आहेत. त्यामुळे चंदन चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. मागील काही महिन्यात चोरट्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारासह बंडगार्डन रस्त्यावरील टाटा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या परिसरातून चंदनाची झाडे कापून नेली आहेत.
कोंढवा भागातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग अँड मॅनेंजमेंट (एनआयबीएम) संस्थेच्या आवारातील चंदनाचे झाड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एनआयबीएम संस्थेतील सुरक्षारक्षक प्रमोद कटके याने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. चंदन चोरट्यांनी कॅम्प परिसरातील डॉ. कोयाजी रस्त्यावरील बंगला क्रमांक १३ मधील दोन चंदनाची झाडे चोरून नेली आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात दिवसेंदिवस चंदनचोरीच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांची सुरक्षायंत्रणा आणि हद्दीतील पोलीस नेमके करत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
चंदनचोरांचे मोठे रॅकेट
शासकीय संस्थेच्या प्रत्येक आवार मोठा असल्यामुळे सुरक्षायंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. त्यामुळे दिवसाढवळ्या चंदनचोरांकडून रेकी केली जाते. त्यानंतर एक किंवा दोन साथीदारांच्या मदतीने अवघ्या काही मिनीटांमध्ये चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चंदनाला मोठी किंमत आहे. त्यानुसार तस्करांकडून रॅकेटद्वारे चंदनाची विक्री केली जाते. त्यामुळे चंदनचोरट्यांच्या सक्रिय टोळीचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.































































