सांगलीतील 160 शाळांना अद्याप कुलूप, विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करून आठवडा उलटून गेला आहे. मात्र, अद्यापि एक लाखाहून अधिक विद्यार्थी शाळेकडे फिरकलेले नाहीत. 160 शाळांनी कुलूप काढले नाही. अद्याप कोरोनाची धास्ती शाळा व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाचे धोरण ठरवताना मोठी अडचण होणार आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आज या स्थितीचा आढावा घेतला. सांगली जिल्ह्यात 15 मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. आठ महिन्यांनंतर म्हणजे 23 नोव्हेंबरपासून त्या पुन्हा सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. त्याच काळात देशात दिल्ली, गोवा आदी राज्यांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली. त्यातूनही शाळा सुरू करण्यात आल्या.

पहिल्या दिवशी 590 शाळा सुरू झाल्या. आजही तेवढय़ाच शाळा सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण शाळांची संख्या 740 आहे.    विद्यार्थी संख्या 1 लाख 47 हजार 442 आहे. त्यातील 27 हजार 300 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सध्या एकआड एक दिवस शाळा भरत आहेत. त्याहिशेबाने रोज 18 टक्के म्हणजे दोन दिवसांची सरासरी 35 टक्के हजेरी दिसत आहे.

अद्याप एक लाखभर विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. आजपासून शाळा सुरळीत सुरू होतील आणि किमान 40 टक्क्यांपर्यंत हजेरी असेल, अशी अपेक्षा होती. तसे झाले असते तर 80 टक्के विद्यार्थी एक आड एक दिवस शाळेत दिसले असते.