
निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्य़ा लेखाधिकारी व कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
लेखाधिकारी बाबासाहेब महादेव जाधव (वय 38), कनिष्ठ लिपिक बबन रामचंद्र कोळी (वय 57) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदाराने निवडश्रेणी पडताळणी स्टॅम्पिंगसाठी व त्यांच्या मित्राच्या वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पिंग करून मिळण्यासाठी गुरुवारी (दि. 5) सांगली लेखाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला होता. या कार्यालयातील लेखाधिकारी बाबासाहेब जाधव व कनिष्ठ लिपिक बबन कोळी यांनी निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजयनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात सापळा रचून जाधव व कोळी यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार संजय कलगुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, विणा जाधव, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.




























































