
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, व्यवहार बंद असतानाही सांगलीकरांनी रस्त्यांवर गर्दी केल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. सकाळी तुरळक असणारी वर्दळ दुपारनंतर प्रचंड वाढली. पोलीस अटकाव करीत नसल्याने वाहनधारक रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्यामुळे ही गर्दी कशासाठी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद असताना आज सकाळपासून रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळत होती. अनेक वाहनधारक रस्त्यावरून विनाकारण भटकताना दिसत होते. रस्त्यावर चौकाचौकांत पोलीस तैनात होते. मात्र, पोलीस हटकत नसल्यामुळे दुपारनंतर ही गर्दी चांगलीच वाढली होती. लोक बिनधास्तपणे रस्त्यांवरून ये-जा करत होते. सर्व दुकाने, व्यवहार आज पूर्णपणे बंद होते. काही हॉटेल्सने पार्सल सेवा चालू ठेवली होती. मात्र, संचारबंदीचे वातावरण कुठेही पाहायला मिळत नव्हते. दुपारनंतर जिल्हा पोलीसप्रमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

























































