संगमेश्वरात आढळला ब्लॅक पँथर, वन विभागाने लावले कॅमेरे

910

दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ‘बगीरा’ अर्थात ब्लॅक पॅन्थरचे (बिबटय़ा) आज संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले. आज सकाळीच या भागात त्याचा वावर असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर शेअर केला. वन विभागाने त्याला दुजोरा दिला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभाकडून आज सायंकाळी तेथे कॅमेरे लावण्यात येत असल्याचे वन विभागाने सांगितले.

ब्लॅक पॅन्थर ही बिबटय़ाची जात आहे. मात्र त्याचा रंग पूर्ण काळा म्हणून तो विशेष आणि दुर्मिळ आहे. यापूर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला जीवदान देण्यात आले होते. त्यानंतर गुहागरमध्ये एका ब्लॅक पॅन्थरचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आता संगमेश्वर तालुक्यात ब्लॅक पॅंथरचा वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे. कोंडीवरे येथील जंगलात ब्लॅक पॅन्थरचे अनेकांना दर्शन झाले. ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ केला असून तो वन विभाग आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत रत्नागिरी वन अधिकाऱयांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. गुहागर, राजापूरनंतर आता संगमेश्वर तालुक्यातही ब्लॅक पॅन्थर आढळून आला ही पर्यावरणप्रेमीना आनंदाची बाब आहे.

कोंडिवरे येथे ब्लॅक पॅंथर आढळला असून व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे. आपणच हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता . त्यानुसार आज वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कोंडिवरे येथे दाखल झाले असून त्यांनी त्याचा वावर असणाऱया ठिकाणी कॅमेरे लावले आहेत – जाकीर शेकासन, सरपंच, कोंडिवरे

कोंडीवरे (ता. संगमेश्वर) येथे आज ब्लॅक पॅन्थरचे दर्शन झाल्याची माहिती खरी आहे. त्या भागात त्याचा वावर असल्याची माहिती होती. त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लवकरच तेथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. – प्रियांका लगड, रत्नागिरी परिक्षत्र वन अधिकारी

आपली प्रतिक्रिया द्या