
सामना प्रतिनिधी । देवरुख
गेली अनेक वर्षे वाहनचालकांसह पादचाऱ्यांकडून रुंदीकरणाची मागणी होत असलेल्या संगमेश्वर साखरपा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणास अखेर ठेकेदाराने प्रारंभ केला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम साखरपा घाट रस्त्याकडून सुरु करण्यात आले असून संगमेश्वरकडे रुंदीकरणाचा शेवट होणार आहे. या दरम्यान असणारी अतिक्रमणे देखील आता आपोआपच दूर होवून वाहतूकीला निर्माण होणारे विविध प्रकारचे अडथळे संपुष्टात येणार आहेत. दरम्यान ३२ किमी लांबीच्या या मार्गासाठी ३२ कोटी म्हणजेच एक किमीच्या कामाला सरासरी एक कोटी असा खर्च अपेक्षित आहे. रुंदीकरणादरम्यान अवघड वळणे रुंद करणे, साईडपट्टी, गटारे, अरुंद मोऱ्यांचे रुंदीकरण आणि अखेरीस संपूर्ण मार्गाचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान पुढील वर्षीपासुन तरी या मार्गावरुन सुखकर प्रवास करायला मिळणार अशी खात्री झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
सद्यस्थितीत संगमेश्वर साखरपा मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे आणि कंटाळवाणे ठरत आहे. या मार्गाचे रुंदीकरण होत असल्याने सध्या पडलेले खड्डे बुजविण्याकडे आणि साईडपट्टीच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. एकूण ३२ किमी लांबीचे हे अंतर खरंतर एक तासात पार व्हायला पाहिजे मात्र सध्या दोन तासांचा कालावधी लागत असल्याने हा प्रवास वेळकाढू आणि कंटाळवाण ठरत आहे. संगमेश्वर साखरपा हा राज्यमार्ग म्हणून अस्तित्वात असला तरी, सध्या मात्र तो ग्रामीण मार्ग भासत आहे. अनेक ठिकाणी असणारी अरुंद वळणे, अरुंद मोऱ्या, साईडपट्टीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत असतात. अवजड वाहने समोरासमोर आल्यास एका वाहनाला थांबल्याशिवाय दुसरे वाहन जावू शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे.
रत्नागिरी कोल्हापूर या मार्गाला जोडणारा संगमेश्वर साखरपा हा मार्ग मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने सतत गजबजलेला असतो. रत्नागिरी नागपूर या मार्गाचे चौपदरीकरण मंजूर झाल्यानंतर संगमेश्वर साखरपा या राज्य मार्गाला रुंदीकरणाचे वेध लागले होते. याबाबत सर्वेक्षण झाल्यानंतर तब्बल ३२ कोटींचा निधी यासाठी मंजूर झाला. मात्र निवीदा प्रक्रीयेसह विविध कारणांमुळेया मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु होत नव्हते. याबाबत वाहनचालक , पादचारी सतत नाराजी व्यक्त करुन बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते.
सध्या या मार्गाची रुंदी सात मीटर आहे रुंदीकरण झाल्यानंतर ती दहा मीटर होणार आहे. याचाच अर्थ तब्बल तीन मीटरने म्हणजेच जवळपास दहा फुटांनी हा मार्ग रुंद होणार असल्याने अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे. साखरपा आणि कोसुंब घाटी येथे अवघड आणि अरुंद वळणांमुळे सतत अपघात घडत असल्याने रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ प्रथम साखरपा घाटीतून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी संगमेश्वर नजीकच्या बुरंबी येथील पूलाजवळचा जोडरस्ता खचला होता. यामुळे पूलाला धोका निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सध्याच्या रुंदीकरणात या पूलाच्या रुंदीकरणाचा समावेश नाही.
संगमेश्वर ते देवरुख या मार्गावर संगमेश्वर बसस्थानकापासून देवरुख सह्याद्रीनगर पर्यंत दुतर्फा असंख्य अतिक्रमणे उभारण्यात आली आहेत. सध्या देखील संगमेश्वर बसस्थानकाजवळ एका रात्रीत पक्क्या इमारती उभ्या केल्या जात आहेत मात्र या अनधिकृत बांधकामांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करते परिणामी संगमेश्वर बसस्थानकाजवळ नेहमीच वाहतूकीचा खोळंबा होवून वादावादी होण्याचे प्रकार दररोज घडत असतात. आता होणाऱ्या रुंदीकरणामुळे ही सर्व अतिक्रमणे हटविली जातील या अपेक्षेने वाहनचालकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. रुंदीकरणाचे हे काम पुढील वर्षभर चालेल असा अंदाज आहे. मात्र ठेकेदाराने मोठी यंत्रणा वापरुन हे काम मुदतीआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.





























































