संगमनेरात बनावट सोनेतारण घोटाळ्यांचे सत्र सुरूच, जी. एस. महानगर सहकारी बँकेची 83 लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणाऱया आणि त्या माध्यमातून सोनेतारण करणाऱया कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणाऱया गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून आणखी एका बँकेची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही बँकांमधील घोटाळे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यांमुळे या बँकांची विश्वासार्हतादेखील धोक्यात आली आहे.

मुंबई येथील प्रतिष्ठत असलेल्या जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे. या बँकेत बनावट सोन्याच्या माध्यमातून 23 कर्जदारांनी बँकेची 82 लाख 57 हजार 834 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह 23 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुह्यातील आणि या गुह्यातील काही आरोपी तेच-तेच असल्याचे दिसते.

गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या माध्यमातून यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे 68 लाख, नासिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे सव्वाचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत. त्यात आता आणखी या एका नवीन गुह्याची भर पडली आहे. यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या फसवणूक प्रकरणात शहाणे याच्यासह काही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्याविरोधात सोनेतारण कर्ज प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांना समजली होती. त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती तातडीने आपल्या बँकेच्या मुख्य शाखेला दिली. बँकेच्या व्यवस्थापनाने गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्यासह सोनेतारण कर्जदारांना नोटिसा पाठवून दागिन्यांची तपासणी करण्यासाठी बँकेत हजर राहण्यास कळविले होते. या तपासणीमध्ये 23 कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळले. या कर्जदारांनी बँकेची 82 लाख 57 हजार 834 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

1 जुलै 2016 पासून जगदीश शहाणे हा बँकेत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम पाहत आहे. शहाणे यांनी सोनेतारण करणाऱया कर्जदारांच्या सोन्याची शुद्धता तपासणी करून त्यासंदर्भात ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोनेतारण कर्ज दिले जाते. कर्जदाराकडे सोने खोटे निघाल्यास त्यास गोल्ड व्हॅल्यूअर आणि कर्जदार जबाबदार असतो, असे महानगर बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

जी. एस. महानगर बँकेची फसवणूक करणारे आरोपी

z गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे, रवींद्र रमेश राजगुरू (दोघे रा. मालदाड रोड), राजेश केशवराव नेवासकर (रा. गणेशनगर), आयुब उस्मान पठाण, महेश रामचंद्र जोशी, ज्ञानेश्वर त्र्यंबक पगारे, विशाल काशिनाथ वाकचौरे, वैभव प्रकाश वाकचौरे, राजेश विश्वनाथ पवार, राजेंद्र काशिनाथ वाकचौरे, शशिकला विश्वनाथ पवार (सर्व रा. घुलेवाडी), योगेश शंकर सूर्यवंशी, शरद मारुती पर्बत (सर्व रा. ढोलेवाडी), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. साळीवाडा), संदीप नंदलाल काळंगे (रा. इंदिरानगर), नवनाथ भरत घोडेकर (रा. घोडेकरमळा), नाजीम अब्दुलमान शेख (रा. मोगलपुरा), सचिन मनलभाऊ होलम (रा. सय्यदबाबा चौक), अनिल राजाराम पावबाके, विजय भास्कर अवचिते (दोघे रा. पावबाकी रोड), प्रतीक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), रामभाऊ भावका पुणेकर (रा. डिग्रस), उषा शिवाजी दुधवडे (रा. सावरगावतळ).