संगमनेरमध्ये डोळ्यात मिरचीपूड टाकून सराफा व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डोळ्यात मिरचीपूड टाकून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी सराफी व्यापारी प्रसाद नांदुरकर दुकान बंद करून सोन्या-चांदीचे दागिने पिशवीमध्ये भरून घरी जात होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि मारहाण करत दागिन्यांनी भरलेली पिशवी पळवली होती. याप्रकरणी प्रसाद नांदुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आश्वी पोलीस स्थानकात कलम 394,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभिर्य पाहता पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलिसांचे पथक स्थापन करून तपासाचे आदेश दिले. याच दरम्यान सदर आरोपी सोन्या-चांदीचे दागिने, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी नेवासा फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाला मिळाली. यानंतर पोलिसांनी नेवासा फाटा येथे सापळी रचला आणि खंडेश्वर ठोंबळ (व – 23), आकाश चौधरी (वय – 23) आणि प्रमोद गायकवाड (वय – 33) यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसं आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळाले. हे दागिने संगमनेर येथून लुटल्याची कबुली आरोपींनी दिली.

Image

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून 8 लाख 50 हजार 472 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 30 हजार रुपयांचा गावठी कट्टा, 1500 रुपयांचे तीन जिवंत काडतुसं, 5 लाखांची स्कॉर्पिओ आणि 45 हजार किंमतीचे मोबाईल असा एकूण 14 लाख 26 हजार 972 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.