
तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या बोरबन (सराटी) येथे जमिनीला पडलेल्या भेगा या धोकादायक नसून, दुर्घटना होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्यातरी घाबरण्यासारखे काही नाही, असा निर्वाळा या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी दिला आहे. यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
संगमनेर तालुक्यातील बोरबन परिसरात टेकडवाडी वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने व एका कूपनलिकेचे पाणी गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 1) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. ही बाब सध्यातरी धोकादायक नसल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर 2019 साली बोरबन येथील काळदरा डोंगर परिसरात खडकाला पडलेल्या भेगा, मेरी संस्थेचे अहवाल, जुने अहवाल, कार्यालयीन उपलब्ध असलेली माहिती तसेच सॅटेलाइट चित्रण, येथील क्षेत्र कमकुवत क्षेत्र आहे का, लगतच्या मुळा नदीला आलेले रोटेशनचा काही संबंध आहे का, या सर्व बाबींचा अभ्यास करून या जमिनीतील भेगांचे कारण स्पष्ट होईल, असेही कदम म्हणाल्या. यावेळी तलाठी दादा शेख, सरपंच संदेश गाडेकर, शशिकांत खोंड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.






























































