मुद्दा- रसिकांची ‘संगीत मैफल’

>> यशोधन जटार

‘संगीत मैफल’, ही संगीतविषयक मासिक पत्रिका 20व्या वर्षात पदार्पण करणार आहे. ऑगस्ट 2003 मध्ये ‘मैफल’चा पहिला अंक अधिकृतरीत्या प्रकाशित झाला. ‘संगीत मैफल’च्या अंकात (शक्यतो) पुण्यातील सांगीतिक कार्यक्रमांचे वृत्तांत असतात. त्याचबरोबर, एका कलाकाराची माहिती ‘संवाद’ या सदरातून दिली जाते. आजपर्यंत सुमारे 225 मान्यवर कलाकारांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. आजही ही पत्रिका नियमित प्रकाशित होत आहे. ‘संगीत मैफल’च्या अंकांमधून, कार्यक्रमांचे वृत्तांत, संगीतविषयक पुरस्कार मिळालेल्या कलाकारांचे ‘अभिनंदन’ हे सदर, गाण्यांच्या जन्माच्या मनोरंजक गोष्टी, ‘संगीतामृत’ व ‘ओंजळीतील आठवणी’ ही डॉ. माधवी नानल यांची सदरे, ‘गुरुवंदना’ या सदराद्वारे ज्येष्ठ गुरुजनांची जीवनी, आणि ‘स्वरांजली’मधून दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली इ. अनेक सदरे नियमितपणे प्रसिद्ध केली जातात. यापूर्वी, ‘क्षण भाग्याचा’ या सदरातून, माझ्या संग्रहातील संगीत क्षेत्रातील कलाकाराची स्वाक्षरी व छायाचित्र, वैविध्यपूर्ण प्रचलित व अप्रचलित वाद्यांची माहिती, ‘गीतरंग’ हे गाण्यांची माहिती असलेले सदर, ‘कलेचा कारक शुक्र’ (कलाकाराच्या पत्रिकेतील शुक्र या ग्रहाच्या स्थानावरून त्या कलाकाराचे कलेच्या क्षेत्रातील असलेले योगदान) ही पै. गिरीशचंद्र बावडेकर यांची लेखमाला, एका रागाची माहिती, त्यावर आधारित गाणी, अशी सदरे प्रकाशित झाली आहेत.

सुरुवातीला मी हा अंक पोस्टाने एक रुपयाचे तिकिट लावून रसिकांना फुकट पाठवायचो. पण काही हितचिंतक म्हणाले की लोकांना अंक फुकट पाठवला तर त्याची किंमत राहणार नाही. म्हणून त्याची वार्षिक वर्गणी रु.25ठेवली, जेणेकरून रसिकांना आणि विशेषतः संगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे सभासद होता येईल. या अंकाची प्रसिद्धी व्हावी म्हणून संगीताच्या ज्या कार्यक्रमांना मी जात असे, तिथे कार्यक्रम संपल्यावर, दारात उभे राहून मी रसिकांना हे अंक मोफत वाटत असे. हळू-हळू या अंकाची मौखिक प्रसिद्धी होऊन सभासद संख्या वाढत गेली. त्याकाळी मोबाईल, फेसबुक इ. प्रसार माध्यमे नसल्यामुळे हे सर्व करावे लागले.

या संपूर्ण प्रवासात मला असंख्य रसिकांचे, कलाकारांचे आणि हितचिंतकांचे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले. आकाशवाणीचे माजी केंद्रसंचालक रवींद्र आपटे, संगीताच्या अभ्यासक डॉ. राजश्री महाजनी, निवेदिका वीणा केळकर आदींनी कलाकारांची भेट घडवून दिली व ‘संवाद’ या सदरासाठी कलाकारांची माहिती माझ्यापर्यंत पोहचविली. माझी पत्नी आणि व्हायोलिनवादिका उमा जटार हिचेही मोलाचे सहकार्य मला लाभते.