
‘माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या आणि अशा अनेक अभंगांच्या भक्तिरसात आज दिल्लीकर न्हाऊन निघाले. निमित्त होते शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या संगीत संध्या रजनीचे. मैथिली ठाकूर या गुणवान नवोदित गायिकेने आपल्या अवीट आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक तानेबाने सुरू असतानाच आज सर्वांनाच सुखावणारी, मन प्रफुल्लित करणारी संगीत मेजवानी मिळाली ती खासदार संजय राऊत यांच्या पुढाकारामुळे. 15 सफदरजंग लेन या खासदार राऊत यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर मैथिली ठाकूर तसेच अयाची व रिषव या बहीण-भावाच्या जोडीने उपस्थितांची मने जिंकली.
‘तू सुखकर्ता’ या गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझे माहेर पंढरी’ या मराठी अभंगांनी उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया’, ‘खेले मसाने होली’ या होळीच्या खास गाण्यांनी कार्यक्रमात गहिरे रंग भरले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गिरीश बापट, शिवसेनेचे सर्व खासदार तसेच वर्षा राऊत व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मैथिली ठाकूर यांचा शरद पवार यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.

























































