
समोरून भरधाव वेगात उद्यान एक्सप्रेस येत असताना रेल्वे रुळावर पडलेल्या 6 वर्षांच्या साहीलचा जीव शुभम शेळके याने वाचवला होता. शुभम शेळके याने जे अतुलनीय धाडस दाखवलं, त्याबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. वांगणी स्थानकावर हा सगळा प्रकार घडला होता, जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. साहील रुळावर पडल्यानंतर त्याची आई जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडताना दिसली होती. साहीलच्या आईचं नाव संगीता असून ती अंध आहे.
शुभम याने साहीलचा जीव वाचवल्यामुळे संगीताने शुभमचे साश्रुनयनांनी आभार मानले आहेत. साहील हा संगीताच्या जीवनातील एकमेव आधार असल्याने त्याचा जीव वाचवणारा शुभम हा संगीतासाठी देवदूतासमान आहे. संगीता या प्रसंगात जरी हतबल दिसली असली तरी आजपर्यंत तिने मुलाला वाढवण्यासाठी आणि त्याच्या संगोपनासाठी जिद्दीने संघर्ष केला आहे. IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना संगीताने सांगितले की ती जन्मापासून दृष्टीहीन नव्हती. वयाच्या दुसऱ्या वर्षी कुठल्यातरी आजारामुळे आपली दृष्टी गेली असं तिने सांगितलं आहे. तिच्या वडिलांनी तिला नांदेडमधल्या डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवलं होतं, मात्र ते देखील संगीताची दृष्टी परत आणू शकले नाहीत.
संगीताचं अकोल्यातील अर्जुन नावाच्या माणसाठी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी अर्जुनने संगीताला सोडून दिलं, तेव्हापासून तिच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. साहील आणि स्वत:चं पालनपोषण करण्यासाठी संगीता वांगणी स्थानकात थांबणाऱ्या गाड्यांमध्ये लहानमोठ्या वस्तू विकण्याचं काम करते. महिन्याला मला 10 हजार रुपयांच्या आसपास मिळायचे, मात्र लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचं ती सांगते. तिच्यासाठी आणि साहीलसाठी दोनवेळचं जेवण कसं मिळवायचं याची भ्रांत तिला रोज सतावत असते. संगीताने 3 हजार रुपयांच्या भाड्यावर एक खोली घेतली आहे. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी संगीताने साहीलला बदलापूरमधील बाल विकास मंदिर शाळेत दाखलाही घेतला आहे. साहील हा अत्यंत हुशार आहे, मात्र लॉकडाऊनमध्ये त्याच्या शिक्षणात अडथळे यायला लागले असं त्याच्या आईने सांगितलं आहे.
साहील हा माझा आधार असून तोच माझी दृष्टी असल्याचं संगीताने म्हटलं आहे. संगीताचा संघर्ष पाहून काही मंडळी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. यात सर्वात पुढे होता तो साहीलचा जीव वाचवणारा शुभम शेळके. शुभमने त्याला मिळालेल्या बक्षिसातील अर्धी रक्कम म्हणजेच 25 हजार रुपये साहीलच्या शिक्षणासाठी संगीताला दिले आहेत.
बदलापुरातील काही पत्रकारांनी मिळून संगीताला 4 हजार रुपयांची मदत केली. त्यांनी या दोघांसाठी काही कपडेही घेऊन दिले. भिवंडीतील जैन महासंघाचे अशोक जैन यांनी संगीताची दृष्टी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर हेमेंद्र शहा हे संगीताच्या डोळ्यांची लवकरच तपासणी करणार असल्याचं जैन यांनी सांगितलं आहे. मुंबईतील हिरेव्यापारी असलेले धर्मेश झवेरी यांनीही त्यांना शक्य होईल ती मदत संगीतासाठी करण्याची तयारी दाखवली आहे.































































