सांगली – कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन

सांगली पोलीस ठाण्या कडील चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मात्र कोरोनाची लागण झालेल्या दोघा आरोपींनी एका महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटर मधून खिडकीचे गज वाकवून पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रोडवर एका वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून चौघांनी लुटले होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शिताफीने 17 सप्टेंबर रोजी या चौघांना अटक केली होती त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली.त्यांना कारागृहात दाखल करत असताना त्यांची कोरोना चाचणी घेतली त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या दोघांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या एका महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघांनी खिडकीच्या काचा फोडून आणि गज वाकवून पलायन केलं ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कारागृह प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या