सांगलीत महागडय़ा सायकली चोरणाऱ्याला अटक, विश्रामबाग पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली शहरासह परिसरात महागडय़ा सायकल चोरणाऱयाच्या मुसक्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या. एका शिक्षकाच्या प्रसंगावधानाने पोलिसांच्या जाळ्यात हा चोरटा अडकला. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीच्या तब्बल सहा महागडय़ा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

अविनाश कुमार आवळे (वय 23, रा. चांदणी चौक, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

सांगलीसह शहर परिसरातून गेल्या काही दिवसांपासून सायकली चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यात महागडय़ा आणि इंपोर्टेड सायकली चोरटय़ांकडून लक्ष केल्या जात होत्या. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे चोरटे सायकल चोरी करीत होते. शहरातील एका महाविद्यालय परिसरातील सायकली सोमवारी (दि. 19) चोरीला गेल्या होत्या. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. यानंतर याच महाविद्यालयातील एका शिक्षकाने या सायकल स्टॅण्डवर मंगळवारी सकाळी पाळत ठेवली. संशयित अविनाश आवळे हा सलग दुसऱया दिवशी सायकल चोरण्यासाठी याठिकाणी आला. त्याने स्टॅण्डमध्ये लावलेली एक सायकल लॉक तोडून चोरली. ही सायकल तो चांदणी चौक येथे घेऊन थांबला होता. आवळे याचा पाठलाग सदरच्या शिक्षकाने केला. चांदणी चौक येथे गेल्यानंतर संबंधित शिक्षकांनी विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱयांनी त्याला सापळा लावून पकडले. कर्मचाऱयांनी त्याच्याकडे सायकलीबाबत कसून चौकशी केली असता सदरच्या सायकल डेक्कन इन्स्टिटय़ूट येथून चोरल्याचे त्याने सांगितले. तसेच इतर सायकली या त्रिकोणी बागेजवळ व विश्रामबाग परिसरात आणखी 5 सायकली चोरी केल्या असल्याची कबुली त्याने दिली आहे.