
सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये सांगली महापालिकेच्या वतीने कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांना चांगलाच वचक बसला आहे. सांगली शहरात आज नेहमी गजबज असलेल्या ‘डी-मार्ट’बरोबर संजयनगरमध्येही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सांगली मनपाकडून कोरोना चाचणीवर भर देण्यात आला आहे. विशेष सार्वजनिक आस्थापना आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. ‘डी-मार्ट’मधील ग्राहक, कर्मचारी यांच्याबरोबर मिरज, कुपवाड आणि संजयनगर पत्र्याच्या चाळीत नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे महापालिका आयुक्त कापडणीस यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचा आदेश दिला होता. यानुसार शुक्रवारपासून मनपा क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी आणि व्यापारी आस्थापनांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी ‘डी-मार्ट’मधील ग्राहक आणि आस्थापनावरील कर्मचाऱयांची रॅपिड आणि आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हनुमाननगर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांची वैद्यकीय टीम कार्यरत होती. यावेळी सहायक आयुक्त एस. एस. खरात, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, निरीक्षक अंजली कुदळे, राजू गोंधळे, डी-मार्ट व्यवस्थापक हृषीकेश नाईक आदी उपस्थित होते.
दरम्यान, संजयनगर येथील पत्र्याची चाळ परिसरातील नागरिकांचाही रॅपिड आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. या ठिकाणी उपायुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेवक मनोज सरगर, संजय कांबळे, मनपाचे अधिकारी काका हलवाई उपस्थित होते. मिरजेतही उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिलीप घोरपडे आणि कुपवाडमध्ये सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमने व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांची रॅपिड आणि आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे.
या मोहिमेमुळे छुप्या कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
बाधित असताना बाहेर फिरणाऱयांची कोरोना सेंटरमध्ये रवानगी
सांगलीतील कोल्हापूर रोडवरील वॉर्ड क्रमांक 14मध्ये रामनगर पहिली गल्ली येथे राहत असलेली तीन मुले पॉझिटिव्ह असताना बाहेर फिरत असल्याची माहिती आरोग्यसेविकांकडून मिळताच महापालिका प्रशासनाकडून त्यांना तातडीने ऍम्ब्युलन्समधून सीसीसी मिरज येथे स्थलांतरित करण्यात आले. यापुढे होम आयसोलेशनमध्ये असणारा कोरोना पॉझिटिव्ह रस्त्यावर दिसल्यास त्याला महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये भरती केले जाईल, असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.


























































