सांगली मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे तौफिक शिकलगार विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिकेच्या प्रभाग 16(अ)च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तौफिक शिकलगार जवळपास चार हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा पराभव केला.

माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने दिवंगत हारुण शिकलगार यांचे चिरंजीव तौफिक शिकलगार यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप, शिवसेनेसह तीन अपक्ष उमेदवारांबरोबर त्यांची लढत झाली. या पोटनिवडणुकीची मतमोजणी स्टेशन रोडवरील महापालिका कार्यालयात सकाळी 10 वाजता सुरू झाली. अवघ्या एका तासात निकाल जाहीर झाला.

तौफिक शिकलगार यांना सात हजार 429 मते मिळाली. भाजपचे अमोल गवळी यांना 3434 मते मिळाली. शिकलगार हे 3995 मताधिक्याने विजयी झाले. शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 535, तर अपक्ष उमेदवार सुरेश सावंत यांना 587 मते मिळाली. भाजपचे उमेदवार अमोल गवळी यांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठsची केली होती. दोन वेळा त्यांनी या प्रभागात प्रचाराला हजेरी लावली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, भाजपला पराभवाचा जोरदार फटका बसला.