सांगली महापालिकेकडून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेने बुधवारी विश्रामबाग गणपती मंदिर ते व्हाइट हाऊस मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. याचबरोबर या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या हातगाडय़ा कायमस्वरूपी स्थायी स्वरूपात लावू नयेत, अशा सूचनाही अतिक्रमण विभागाने हातगाडीचालकांना केल्या आहेत. अशा कायमस्वरूपी उभ्या असणाऱ्या हातगाडय़ांवर गुरुवारपासून कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख तथा सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

विश्रामबाग गणपती मंदिर चौक ते वालचंद कॉलेज या मार्गावर दुतर्फा मोठय़ा प्रमाणात हातगाडय़ा उभ्या असतात. यातील अनेक हातगाडीवाल्यांकडे परवाने नसल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या प्रभाग समिती 2 कडून सर्व अधिकृत फेरीवाल्यांना 15 दिवसांपूर्वी हातगाडय़ा व्यवसायानंतर जागेवर ठेवू नयेत, अशा आशयाच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, हातगाडय़ा हटविल्या जात नसल्याने बुधवारी सहायक आयुक्त सावता खरात आणि अतिक्रमण विभागप्रमुख दत्तात्रय गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत वळसे, राजू गोंधळे, पंकज गोंधळे, विक्रम घाडगे यांच्या पथकाने सायंकाळी हातगाडीचालकांना अंतिम इशारा दिला.