सांगलीत सराईत दुचाकीचोराला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आठ दुचाकी हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सराईत दुचाकीचोराला अटक केली असून, त्याने चोरलेल्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. करण मोहन चव्हाण (वय 26, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) असे या चोरटय़ाचे नाव असून, तो पहिल्यांदाच गुन्हेगारांच्या यादीवर आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

सांगली जिह्यात दुचाकी चोऱयांचे प्रमाण वाढतच चालल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुचाकी चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱयांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिंदे यांनीही आपल्या अधिकारी, अंमलदारांना दुचाकी चोरटय़ांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी रवाना केले होते. हे पथक दुचाकी चोरांची माहिती काढत असतानाच पोलीस अंमलदार सुनील चौधरी, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आणि गौतम कांबळे यांना करण चव्हाण याच्याबाबत माहिती मिळाली. चव्हाण हा चोरीची दुचाकी विकण्यासाठी सांगलीतील धामणी चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी कसून चौकशी केल्यानंतर चव्हाण याने गुह्याची कबुली दिली. संबंधित दुचाकी त्याने विलिंग्डन महाविद्यालयाच्या पाठीमागील कॉलनीतून चोरल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्याने ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतूनही दुचाकी चोरल्याचे कबूल केले. चोरलेल्या सर्व दुचाकी त्याने नागज येथील आपल्या घराजवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत 2 लाख 40 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.