‘हॉटेल मटण-भाकरी’च्या नाकाखाली जुगारअड्डा, सांगोला पोलिसांची धाड; अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

तालुक्यातील सोनंद गावात ‘हॉटेल मटण-भाकरी’च्या आडून जुगारअड्डा सुरू असल्याचे आज पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे. या कारवाईत 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून दोन कोटी 68 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंढरपूर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील ‘हॉटेल मटण-भाकरी’ असा फलक असलेल्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर पोलिसांनी धाड टाकली. विनापरवाना जुगार क्लब चालविणारे सचिन साहेबराल काशिद (रा. सोनंद, ता. सांगोला) आणि शंभूलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी, जि. बेळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी जुगार खेळणाऱया 50 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख 16 लाख नऊ हजार, 62 मोबाईल, 26 चारचाकी, 61 दुचाकी वाहने आणि देशी-विदेशी दारू असा एकूण दोन कोटी 68 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर, भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, यांच्या पथकाने ही कारवाई केली.