
नवी मुंबईतील दि बा पाटील विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. मुंबई विमानतळावर जसे शिवसेनेने मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या होत्या तसंच नवी मुंबई विमानतळावर देखील मराठी माणसाला , भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, अन्यथा संघर्ष होईल असे संजय राऊत म्हणाले.
नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या नाही तर संघर्ष होईल, संजय राऊत यांचा इशारा#sanjayRaut @rautsanjay61 pic.twitter.com/iKMFEjhKes
— Saamana Online (@SaamanaOnline) October 8, 2025
”नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिलं होतं. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या संघर्षासाठी तयार झालेली संघटना आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील याचं नाव नवी मुंबई विमानतळाला देणं हा महाराष्ट्रातील सर्व भूमीपुत्रांचा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या लढ्याचा सन्मान आहे. या कार्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मोठा हातभार लाभला. या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं आम्ही स्वागत करतो. पण यासोबतच मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख पुसली जाता कामा नये. ते विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आहे. तसंच दुसरी गोष्ट मुंबई विमानतळ जेव्हा बनलं तेव्हा शिवसेनेनं तिथे भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिथे भूमिपुत्रांचाच आवाज राहिला. आता नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावाने गरबा खेळला जाऊ नये. तिथे देखील भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या हव्या. तसं झालं नाही तर संघर्ष होईल”, असे संजय राऊत म्हणाले.