नारायण राणे यांना सत्र न्यायालयाचा झटका! संजय राऊत मानहानी प्रकरण, समन्सला आव्हान देणारा अर्ज फेटाळला

वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी माझगाव न्यायालयाने बजावलेल्या समन्सला आव्हान देणारा राणेंचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नारायण राणेंना धक्का बसला असून मानहानी प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणेंना आता माझगाव कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागणार आहेत.

भांडुपच्या कोकण महोत्सवात 15 जानेवारी 2023 रोजी संजय राऊत यांच्याविरोधात बरळल्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी नारायण राणेंना समन्स बजावले होते. या समन्सला विरोध करीत सत्र न्यायालयात राणेंनी अर्ज केला व समन्स रद्द करण्याची मागणी केली. या अर्जावर गेल्या आठवडय़ात अतिरिक्त न्यायाधीश एस आर नावंदर यांच्यासमोर सुनावणी झाली. राणे यांनी केवळ बदनामीच्या हेतूने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बेताल विधाने केली होती. राऊत यांची प्रतिमा मलीन करणे हा एकमेव उद्देश असल्याचा दावा अॅड. सार्थक शेट्टी व अॅड. प्रकाश शेट्टी यांनी केला होता.