दोन हिंदुहृदयसम्राटांचे काय ? मुलायम सिंह यादवांच्या गौरवावरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुलायमसिंह यादवांनी अयोध्येतील करसेवकांवर गोळ्या झाडण्याचे काम केले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्वतः भाजप यांनी मुलायमसिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला. हिंदूंचे हे हत्यारे आहेत, त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अशा मुलायमसिंह यादवांना आपण पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून हा गौरव होत असताना दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांना विसर पडत असल्याबद्दल संजय राऊत यांनी संतप्त उद्गार काढलेत.

मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संजय राऊत म्हणाले की, “मुलायमसिंह यादवांचा गौरव राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून आपण करता, मग वीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार. तुम्हाला कुणी अडवलं. बाळासाहेब ठाकरे यांना कोणतीही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही. त्यांना गरज नाही. मग तुम्ही विचार का केला नाही. किंवा मुलायमसिंहाच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या पक्षानेही मागणी केली नव्हती की मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण द्या. मग तुम्हाला त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. इथे नुसती तैलचित्र लावून, किंवा बाळासाहेब ठाकरे आमचे, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का, ते पाहावं लागेल”

इंडिया टुडे आइणि सी वोटरने प्रसिद्ध केलेल्या सर्व्हेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, “राष्ट्रीय सर्वे हा त्यांच्या बाजूने आहे तो त्यांना हवाय. महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्या विरोधात असल्याने तो त्यांना नकोय. त्या सर्वेनुसार, लोकसभेच्या 34 जागा महाविकास आघाडीला मिळतील, असं अनुमान आहे. पण, आम्ही म्हणतोय की महाविकास आघाडीला साधारण 40 ते 45 मिळतील. मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं की चार पाच जागा मिळाल्या तरी पुरे. माझं असं म्हणणं आहे की, कल्याण डोंबिवलीची जागा त्यांनी वाचवली तरी पुरे.