
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज पुन्हा नोटीस पाठवली. गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणातील कथित घोटाळाप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेसाठी खासदार संजय राऊत हे जिवाचे रान करत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने रडीचा डाव खेळत ईडीची नोटीस त्यांना पाठवल्याचे बोलले जात आहे. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत राऊत यांचा जबाब नोंदवायचा असल्याचे ईडीने म्हटले आहे.
ही नोटीस म्हणजे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे संकेत
मला ईडीची नोटीस पाठवणे म्हणजे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे संकेत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान! महाराष्ट्रात मोठय़ा घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठय़ा लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या…मला अटक करा! जय महाराष्ट्र!’































































