
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना आज सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. कथित पत्राचाळप्रकरणी ‘ईडी’ने 31 जुलै रोजी खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली होती. आज या कोठडीची मुदत संपल्याने खासदार राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जामीन अर्जाबाबत दोन दिवसांत निर्णय
जामीन अर्ज कधी करायचा याचा तूर्त निर्णय घेतलेला नाही, असे सांगतानाच संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत म्हणाले, ‘‘आम्ही जामीन अर्जाविषयी वकिलांशी चर्चा करू आणि दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेऊ.’’ ज्या प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे त्याच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई हा भाजपचा राजकीय डाव आहे, असा पुनरुच्चार सुनील राऊत यांनी केला.
गुडघे टेकणार नाही
न्यायालयाबाहेर संजय राऊत गाडीत बसत असताना पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खासदार राऊत यांनी पुन्हा निक्षून सांगितले की, ‘‘शिवसेना लढत राहील. कदापि गुडघे टेकणार नाही!’’






























































