तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ही विराट सभा गॅरंटी देतेय, राजाभाऊ वाजे शंभर टक्के दिल्ली जाताहेत आणि त्यांच्यासमोर जे उमेदवार उभे आहेत त्यांना इथे पापी घ्यायला आपण ठेवून देऊ, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब खासदार ) नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील प्रचार सभेत भाषणाला सुरवात करत हल्लाबोल केला.

खासदार म्हणून कोणती कामं करणार? नाशिकच्या विकासाचं काय लक्ष्य आहे आणि काय दृष्टी आहे? हे राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत ज्यांना आपण इथे खासदारकीची संधी दिली, त्यांनी काय केलं? हा प्रश्न आजही आपल्या पुढे आहे. त्यांना 50 खोके मिळाले, 100 खोके मिळाले, आणखी काय मिळालं? हा त्यांचा प्रश्न आहे, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिकमध्ये होते. निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले. भाड्याची माणसं तिथे आली. भाषणावेळी एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला, प्रधानमंत्री कांद्यावर बोला. कांद्याच्या प्रश्नावर बोला. कांदा निर्यातबंदी नंतर शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, त्याच्यावर बोला. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी रागाने पाहिलं. डोळे वटारून पाहिलं. आणि फक्त भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा देऊन निघून गेले. भारत माता ही काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे? तो शेतकरीही भारत मातेचाच लेकरू आहे. तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे. तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल. कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल तर या थापाड्याची देशाला गरज नाही. 4 जूननंतर त्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाडमधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं, अटक केली. नरेंद्र मोदी अशा प्रकारे शिवसेनेला घाबरतात, महाराष्ट्राला घाबरतात, शिवसैनिकाला घाबरतात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

देशात प्रचंड बेरोजगारी आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडली आहे. तरीही माझ्या शिवाय देशाला पर्याय नाही, अशी नरेंद्र मोदींना घमेंड आहे. मी म्हणजे देश, मी म्हणजे इंडिया, मी म्हणजे सर्वकाही… ही घमेंड उतरवायची वेळ आता आली आहे. नव्या भारताचा नवा मंत्र मोदींनी दिला आहे. देशात कामधंदा मंदम… मंदी प्रचंडम… झिंदगी झंडम… फिरभी घमंडम… कसली घमेंड आली आहे तुम्हाला? या देशाची जनता सत्तेवरून तुम्हाला खाली खेचायला निघाली आहे, असं सांगत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना भीमटोला लगावला.

नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते. नंतर इथून कल्याण गेले. कल्याणवरून ते मुंबईत रोड शो करत आहेत. अख्खी मुंबई त्या रोड शोसाठी बंद करून ठेवली आहे. ट्रेन बंद केल्या आहेत. मेट्रो बंद केली आहे. गेल्या एक महिन्यांत मोदींनी महाराष्ट्रात 28 सभा घेतल्या. आणि मुंबईत आज रोड शो घेताहेत. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं, हे लक्षात घ्या. पण तुम्ही कितीही रोड शो, सभा घ्या. हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. महाराष्ट्रात जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे, तिथे भाजपचा पराभव होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा, महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे, हे तुम्हाला खात्रीने सांगतो. नरेंद्र मोदींनी एक वर्षात कर्नाटकमध्ये 27 सभा घेतल्या आणि 28 रोड शो केले. जिथे-जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यांचे 14 मंत्रीही पराभूत झाले. त्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला… गद्दार जिंकले… असं होणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

या इथे, राजाभाऊंविरोधात उभं राहून दाखवा. तुम्हाला 400 जागा जिंकण्याचा अहंकार आहे. उद्धवसाहेबांनी त्यावर चांगलं उत्तर दिलं आहे. 400 पार नाही तर, अब की बार भाजपा तडीपार… निवडणुका फक्त पैशावर जिंकता येत नाहीत. नाशिकमध्ये परवा एक हेलिकॉप्टर उतरलं. महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आले. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून 19 बॅगा उतरवल्या गेल्या. आपण त्याचा व्हिडिओही समोर आणला. 19 बॅगा म्हणजे 19 कोटी रुपये त्यात होते. या 19 बॅगांमध्ये तुमच्या चड्ड्या आणि बनियान होते का? काय होतं त्या बॅगांमध्ये? कोणासाठी आणल्या होत्या 19 बॅगा? आमचा पराभव करण्यासाठी आणल्या. हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही, हे लक्षात घ्या, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र एका क्रांतीच्या दिशेने निघाला आहे. एक लढवय्या नेता, एक संघर्ष करणारा नेता, नरेंद्र मोदी- अमित शहा हे या महाराष्ट्राचे दुश्मन त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवली आहे, ती मशाल या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

माननीय उद्धव ठाकरेसाहेब यांच्यावतीने मी आपल्याला एक गॅरंटी देतो. नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधानपदावर राहणार नाही. महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यांत सत्ता बदल होऊन या राज्याची सूत्रं पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडे आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा वापर करून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. हा जनतेचा आवाज इतका बुलंद आहे, या जनतेच्या बुलंद आवाजामुळे नरेंद्र मोदींच्या खुर्चीला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. राजाभाऊ वाजे आपल्या एक प्रामाणिक सचोटीचा माणूस उद्धवसाहेबांनी आपल्याला उमेदवार म्हणून दिला आहे. मशाल चिन्हावर भरभरून मतदान करू. नवीन चिन्ह असलं तरी ही मशाल पुढल्या चार दिवसांत घराघरात पोहोचवायला पाहिजे. तुम्ही आमचा पक्ष काढून घेतलात, तुम्ही आमचं धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं, तुम्ही आमच्यावर हल्ले केले, आघात केले. तुम्ही आम्हाला अपमानित केलं. तुम्ही महाराष्ट्राला अपमानित केलं. मात्र ही मशाल यापुढे महाराष्ट्राला उजळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही शिवसेना जे नकली म्हणताहेत त्यांना दाखवून द्यायचंय, नाशिकचा हा विराट जनसागर नकली नसून हा तुमच्या पराभवासाठी सज्ज झालेला रौद्ररुप धारण करणारी ही शक्ती आहे, असं संजय राऊत म्हणाले.