युद्धामुळे प्रदूषणाचे काळे ढग हिंदुस्थानवर; सरकारने पर्यावरण तज्ञांची तातडीने बैठक बोलवावी, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या घातक प्रदूषणाचे काळे ढग हिंदुस्थानवरही जमा झालेले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इराणवरचे काळे ढग हे एखादे बॉम्बसारखे घातक ठरतील. यासंदर्भात केंद्र सरकारने तातडीने पर्यावरण तज्ञांची समिती नेमावी, तिची बैठक बोलवावी, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यसभेत केली.

इराणची राजधानी तेहरानवर अमिरेका व इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्याने जग हादरले असून, इराणवरचे हे काळे ढग हिंदुस्थानच्या आसमंतात मोठे संकट म्हणून आले आहेत. मोठय़ा प्रमाणावरील हल्ल्याने इराणमध्ये प्रचंड वायुप्रदूषण झाले असून तिथल्या नागरिकांना श्वासही घेता येत नाहीये. हेच प्रदूषणरूपी ढग हिंदुस्थानावर संकट म्हणून घोंगावत आहेत. सरकारने हे गांभीर्याने घ्यावे व तातडीने समिती नेमावी, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केली. शून्य प्रहरांत त्यांनी देशावर घोंगावणाऱया संकटरूपी काळ्या ढगाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

समस्या फक्त इराणची नाही. विषारी प्रदूषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील संबंध जगाला इशारा दिला आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधत खासदार राऊत यांनी इराण युद्धामुळे विषारी प्रदूषणाचा प्रसार होऊ शकतो. त्यात गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणासारख्या राज्यांना हानी होऊ शकते, असेही नमूद केले. या प्रदूषणामुळे पिके नष्ट होण्याची शक्यता आहे. लोकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. देशाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल. आपला देश अगोदरच आर्थिक संकटातून जात असताना हे आरोग्य संकट देशाला परवडणारे नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

केंद्रीय सशस्त्र बल विधेयक म्हणजे निरंकुश सत्तेचे केंद्रीकरण

केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र दलाच्या विधेयकाच्या रूपाने आणलेले वन आंबरेला बदल हे घातक असून सत्तेच्या निरंकुशतेची नांदी आहे, असे सांगत शिवसेनेने आज या विधेयकाला राज्यसभेत कडाडून विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. देशासाठी बलिदान दिलेल्या सशस्त्र दलाचे एकत्रीकरण करून त्याची धुरा आयपीएस अधिकाऱयाकडे दिली जाणार आहे  हे न्यायाच्या  विरोधात आहे तसेच सीआयपीएफ केडरलाही धक्का देणारे आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.