फडणवीसांना कोंडून दुसरेच कारभार पाहतायत का ? संजय राऊत यांचा सवाल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतिस्थळावर मिंध्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात निष्ठावंत शिवसैनिकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर खोटे दाखल करणे म्हणजे विकृती आहे असे ते म्हणाले. या विकृतीमुळे महाराष्ट्र बदनाम होत असून तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असे त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, ‘कितीही गुन्हे दाखल करा, अटका करा आमचा संघर्ष सुरूच राहील. कायद्याच्या राज्यात एकतर्फी कारवाई करणे यालाच विकृती म्हणतात. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही ? का त्यांना कोंडून दुसरंच कोणीतरी गृहमंत्री चालवत आहे हे पाहावं लागेल.’

महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्दावरून रस्त्यावर उतरलेला असताना राज्याचे गृहमंत्री 5 राज्यांत सुरू असलेल्या प्रचारासाठी जातात. राज्य जळत असताना ते दुसऱ्या राज्यांत प्रचाराला जात आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि गृहमंत्रालयाला राज्यात काय चालले आहे हे माहिती नाहीये. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे असे संजय राऊत यांनी म्हटले.