त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? संपाला चिथावणी देणाऱयांना संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपातून तोडगा काढण्यासाठी कामगारांना चांगली आर्थिक मदत मिळावी म्हणून पॅकेज जाहीर केले. तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय विरोधी पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे नुकसान करत आहेत. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज एसटी संपाला चिथावणी देणाऱयांना केला.

एसटी कामगारांना भरघोस पगारवाढ झाल्यानंतरही संप मागे घेण्याऐवजी त्यांना चिथावले जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. मुंबई ही कामगार-शेतकऱयांच्या लढय़ातून आम्हाला मिळाली आहे. तेव्हा कष्टकऱयांचे नुकसान व्हावे, असा विचार आमचे सरकार कधीही करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसतानादेखील इतक्या मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत एसटी कामगारांना केली जात आहे. एसटी कामगार समजुतीने घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग संपाला चिथावणी देत आहे.

सन्माननीय नेत्यांचा एकेरी उल्लेख करतात, यांची लायकी काय आहे?

एसटी संपादरम्यान एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले? तुम्ही चर्चा करू शकता, पण ज्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपद, पेंद्रीय मंत्रीपद भूषवलेय त्यांचा कामगारांसमोर, माध्यमांसमोर एकेरी उल्लेख करता. तुमचे काय कर्तृत्व आणि योगदान आहे, अशा परखड शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणाऱयांना संजय राऊत यांनी झापले.