
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत झालेल्या चर्चेनंतर या विधेयकावर मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या चर्चेवेळी शिवसना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट केली. समान नागरीक कायद्याच्या दिशेने सरकारने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. आता 370 आणि 35 ए पण कलम पण जाईल. देशात सर्व धर्म आणि जातींसाठी एकच समान कायदा असेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त करत आपण विधेयकाचे समर्थन करत असल्याचे सांगितले. तसेच सरकार करत असलेल्या या कायद्यामुळे बंधनात अडकलेल्या अनेक मुस्लीम महिला मुक्त होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज फक्त संसदेसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्यदिनाचा महिना आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, देशातील अजूनही स्वातंत्र्य नसलेल्या महिलांना आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार आहे. सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त मुस्लीम महिला तिहेरी तलाकच्या बंधनात अडकल्या आहेत. या कायद्यामुळे त्या महिला मुक्त होतील, असे ते म्हणाले. सरकारने कायद्याने आणि संविधानाने देश चालवण्याचा मानस व्यक्त केल्यावर सेक्युलारिझम धोक्यात असल्याची ओरड का होते असा सवालही त्यांनी केला. संविधानाने देश चालवल्यास सेक्युलर विचारांना कसा धोका निर्माण होऊ शकतो, देशात एकच संविधान असायला हवे. नियम, कायदा सर्वांना सारखाच असायला हवा. त्याला जाती-धर्मांचे बंधन नको. संविधानात, देशाच्या कायद्यात नसलेल्या पर्सनल लॉ बोर्डच्या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना त्रास होत असेल, तर पर्सनल लॉ बोर्डचा कायदा रद्द करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सेक्युलारिझमला धोका नसून सेक्युलारिझम अधिक बळकट झाले आहे, असे राऊत म्हणाले.
हिंदू- मुस्लीम असा मतभेद न करता सर्वांना समान कायदा असायला हवा. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर तीन चार दिवसात हे विधयेक राज्यसभेत मांडण्यात आले. त्या तीन चार दिवसांतच देशभरातील 100 पेक्षा जास्त महिलांना तिहेरी तलाक देण्यात आला आहे. सूरतमध्ये मुलगी आजारी असल्याने तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. घरी आल्यावर पतीला पत्नी घरात दिसली नाही. म्हणून त्याने तिला तिहेरी तलाक दिला. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेणे हा गुन्हा आहे काय, असे महिलांना बंधनात ठेवणारे कायदे रद्द होणार असतील तर सरकारचे कौतुक करायला हवे. देशात मजबूत सरकार असून हे मजबूत सरकार असे कायदे रद्द करण्याचे धाडस दाखवते. जेवणात मीठ नाही, पत्नी आजारी आहे, मुलांच्या जेवणासाठी पत्नी पैसे मागते अशा शुल्लक कारणांसाठी तिहेरी तलाक देऊन पत्नीला आणि मुलांना वाऱ्यावर सोडण्यात येते. त्यामुळे सरकार बनवत असलेल्या या कायद्यामुळे अशा महिलांना आधार मिळून त्या सक्षम होणार आहेत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
अनेक मुस्लीम समाज सुधारकही या विधेयकाला पाठिंबा दर्शवत आहेत. ‘आम्हाला अल्लाचा इस्लाम हवा, आम्हाला मुल्लांचा इस्लाम नको’ असे एका मुस्लीम सुधारकाने आपल्याला सांगितल्याचे राऊत म्हणाले. हे सरकार मुल्लांचा इस्लाम संपवून देशात संविधानाचा कायदा आणत आहे. त्यामुळे या विधेकयाचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट केले.


























































