अमित शहा दिल्लीत आल्यावरच भाजप-शिवसेनेत दरी पडू लागली, अरुण जेटलींनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी शिवसेना-भाजपच्या मैत्रीवरही मोठे भाष्य केले. अमित शहा दिल्लीत आल्यावरच भाजप-शिवसेनेत दरी पडू लागली. त्यावेळी अरुण जेटलींनीही अमित शहांना समजवण्याचा प्रयत्न केला होता, असे संजय राऊत म्हणाले.

‘अटकेआधी अमित शहांना फोन, व्यक्त केला संताप’

आपल्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत नाही तर देशात पोहोचलं आहे. मला देशभरातून फोन येत आहेत. गंमत म्हणजे या पुस्तकाची पहिली अवृत्ती काल संपली आणि आज प्रसिद्ध व्हायचं आहे. हे माध्यमांमुळे झालं. तुमचा जो प्रश्न आहे की, माझ्या अटकेआधी मी अमित शहांना देशाच्या गृहमंत्र्यांना फोन केला. कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका असते मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर, आधी त्याच्या जवळचे असतात त्यांच्यावर जोरदार पद्धतीने धाडी घाला. साध्या चाळीतही धाडी घातल्या. हे त्यांनी माझ्याबाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक मित्र ज्यांचा काही संबंध नाही. फक्त माझ्याशी त्यांचा संबंध आहे, मित्र परिवार आहे. मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करावा? मी राजकारणात आहे, मी सहन करेन. पण सकाळपासून धाडी सुरू झाल्या. रात्रीपर्यंत सुरू होत्या. काही लोकांना बोलवून ईडीच्या कार्यालयात, धमक्या दिल्या. हे स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, नाहीतर तुम्हाला अटक करू. सामान्य माणूस ज्याची या सगळ्याची मानसिक तयारी नसते. अचानक त्याला ईडीचे अधिकारी उचलून घेऊन जातात. जसा यमदूत येतो, सैतान येतो आणि खेचत नेताना सिनेमानत, त्या पद्धतीने नेतात. जणू काही आम्ही डॉन आहोत. आम्ही डॉनच आहोत त्या बाबतीत असे त्यावेळी ते वागायचे. दिल्लीत बसलो होतो मी तेव्हा, मला कळलं अशा प्रकारे रेड चालल्यात आहे, आमच्या लोकांना त्रास दिला जातोय. आमच्या कॉलनीमध्ये लोकं राहतात तिथे एक बाजूला गाडी उभी आहे. जागा आहे म्हणून त्याने थांबवली. ती गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेड पडल्या. इथे गाडी थांबवली म्हणजे ही गाडी यांची आहे. मग ते तुमच्या नावावर आहे, असा कोणी तपास करतो का? बकवास, याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात का? त्रास द्यायचा, सगळ्यांना छळायचं. मी अमित शहांना फोन केला, रात्री अकरा वाजता ते गृहमंत्री आहेत. मी फोन केला तेव्हा ते मिटिंगमध्ये होते. त्यांनतर चौथ्या मिनिटाला मला त्यांचा रिटर्न कॉल आला. म्हणाले हा बोलो संजयभाई, प्रेमाने बोलले. मी बोललो अमितभाई, फोन यासाठी केला की तुम्ही देशाचे गृहमंत्री, एक जबाबदार मंत्री, नेते आहात. हे जे सुरू आहे माझ्याबाबतीत त्यावर मला काही बोलायचं नाही. हे राजकारण आहे. तुम्ही मला त्रास देताय हे तुमचं राजकारण आहे. मात्र तुम्ही मला त्रास द्या, पण माझ्यामुळे माझ्या कुटुंबियांना ज्यांचा काही संबंध नाही, माझ्या मित्रांना त्यांच्यावर रेड टाकल्या जात आहेत. तुम्ही त्यांना पकडून घेऊन जाताय. 10-10 तास बसवून ठेवत आहात. हे कोणत्या कायद्यात लिहिलेलं आहे? हे काय आहे? हे तुमच्या मंजुरीशिवाय होतंय, हे मान्य करायला मी तयार नाही. सर्वात आधी तुम्ही हे थांबवा आणि मी दिल्लीत बसलोय. माझा पत्ता तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या समोरच आहे. तुमच्या ईडीच्या टीमला माझ्याकडे पाठवा. मला अटक करायची असेल तर अटक करा. पण ही नौंटकी बंद करा आणि मी फोन ठेवून दिला. ते बोलले मला माहिती नाही, गृहमंत्र्यांना माहिती नाही असं होतं का? एका खासदाराच्या घरावर धाड टाकली जातेय, हे गृहमंत्र्याला माहिती नाही तर ते चुकीचं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, नरकातला स्वर्ग पुस्तकाची देशात चर्चा! आज प्रकाशन सोहळा

‘कारण नसताना इतरांना त्रास देऊन तुमचा कंडू शमवू नका’

आशिष शेलार यांचा त्यानंतर मला फोन आला. मला वाटतं अमितभाईंनी शेलारांना फोन केला असावा, कारण ते मुंबईचे नेते आहेत. मीही मुंबईचा आहे. संजय राऊत यांचा फोन होता, त्यांच्याशी आपण बोलून घ्या, असं शेलार यांना अमितभाईंनी सांगितलं असेल. मग शेलारांचा फोन आला. तुमचं अमितभाईंशी बोलणं झालं. मी बोललो, हो झालं ना बोलणं, गृहमंत्री आहेत ते, असा असा इश्यू आहे. नाही मला अमितभाई म्हटले की संजय राऊत यांच्याशी बोलून घ्या, ते चिडलेले आहेत. मी बोललो या प्रकरणासंदर्भात माझं बोलणं झालेलं आहे. मला त्रास द्या, मी समर्थ आहे. मला फासावर लटकवा पण तुम्ही कारण नसताना इतरांना त्रास देऊन तुमचा कंडू शमवू नका. मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे, असे संजय राऊत म्हणाले. ईडीचे संचालक संजय मिश्रा जाऊन पंतप्रधानांना ब्रीफ करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उघडकीस आणला. किती 1500 कोटी, 1600 कोटी? हे ईडीचे संचालक तेव्हा जाऊन पंतप्रधान कार्यालयात ब्रीफ करत होते. सगळी नौटंकी चालू होती, बकवास. या पुस्तकामध्ये त्या विषयी सगळं आलेलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

‘आम्ही कुठे नरकात गेलो, नरकात शिंदे गेले’

आम्ही कुठे नरकात गेलो, नरकात तुम्ही गेलात. शिंदेंचा संबंध काय? अटकेच्या आधी आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता. अमित शहांशी बोलू का? असं. मी बोललो काही गरज नाही. बोलू का मी वर, हेच ते शिंदे बोलत होते. मी बोललो वर बोललात तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही. काही गरज नाही. मला उद्या अटक होतेय आणि मी तुरुंगात जातो. मी पळून जाणार नाही, वर बोलण्याची गरज नाही. मी एकटा वर बोलू शकतो, मी समर्थ आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पुस्तकावरून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना फटकारले. एकनाथ शिंदेचा फोन आला तेव्हा ते मुख्यमंत्री होते. पण मी नाही सांगितलं. मी ठाम आहे, मी झुकणारा माणूस नाही. माझी मान जरी उडवली तरी मी झुकणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले.

‘फडणवीस बालसाहित्याचा अपमान करताहेत’

देवेंद्र फडणवीस बालसाहित्याचा अपमान करत आहेत. बालसाहित्याला राज्य पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमी पुरस्कार देतं, ज्ञानपीठ पुरस्कार देतं, यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. एवढीच त्यांची लेव्हल आहे, बाकी काही नाही. त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पनी लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढताहेत तसं त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पुस्तकाला बालसाहित्य म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

शिवसेना एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस कामगारांच्या पाठीशी ठाम, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

‘अमित शहांना दोन वेळा समजवलं, अरुण जेटली स्वतः मला बोलले होते…’

अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली होती. अमित शहांना अरुण जेटलींनीही समजवलं होतं, असं करू नका म्हटले होते. अरुण जेटली मला हे स्वतः बोलले की, अमितभाई असं करणं योग्य नाही, शिवसेना ही जुनी साथीदार आहे, त्यांच्या सोबत राहायचं आहे. मी अमित शहांना दोन वेळा सांगितलं, असं अरुण जेटली स्वतः मला बोलले होते. अरुण जेटली आजारी होते, रुग्णालयात होते. तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते. 2014 ची ही गोष्ट आहे, असे सांगत संजय राऊत यांनी अमित शहांवर गंभीर आरोप केला.

‘आताची पोरंटोरं भाजपमध्ये नव्हती, काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले लोक आहेत’

नेस्को मैदानावरील कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते बाळासाहेबांना भेटायला आले तेव्हा तिकडे मीच होते. तेव्हा हे आताचे भाजपवाले नव्हते. फोटो उपलब्ध आहेत. दाखवा ते फोटो. नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकेर आणि संजय राऊत असा एक फोटो उपबल्ध आहे. पुरावे खूप आहेत. उद्धवसाहेबांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी दिलेल्या पाठिंब्याचं पत्र तयार करत असताना मी गंमतीने काढलेला एक व्हिडिओ आहे. तो सुद्धा उपलब्ध आहे. ही आताची पोरंटोरं भाजपमध्ये नव्हती, काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले लोक आहेत. त्यांना काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते त्या काळात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.