आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं , शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपला टोला

राजकारणात टाळा आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडे टाळं आहे तो कुठल्याही गोष्टीला टाळा लावू शकतो आणि ज्याच्याकडे चावी आहे तो कुठलही टाळं उघडू शकतो. आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागलं, असा टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री. पक्षाचे आदेश असतात, सूचना असतात त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडे चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षापूर्वी भाजपच्या सत्तेला टाळं लावलं, असे ते म्हणाले. रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात. ग्रामीण नेतृत्व आहे. त्यांच्या शैलीचे मी नेहमीच कौतुक केलेय, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार नक्कीच तोडगा काढेल

कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथे सुरू झालेले आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. राज्यातील सर्वच घटकांचा त्यांना पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा समाजावर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मांडली आहे. या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या