
शरद पवार यांनीच आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपसोबत जाण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. मात्र त्यांचा दावा स्क्रिप्टेड असून हे लिहून दिलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांचे चारित्र्यहनन ही भाजपची स्क्रिप्ट आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांनी केलेल्या दाव्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकनाथ शिंदे किंवा त्यांची लोकं, अजितदादा आणि त्यांची लोकं जे बोलताहेत ते स्क्रिप्टेड आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आपण पराभव करू शकत नाही हे लक्षात आल्यावर भाजपने ही स्क्रिप्ट लिहून दिली. आधी पक्ष फोडा, घर फोडा आणि त्यातूनही काही जमले नाही तर चारित्र्यहनन करा ही भाजपची निती आहे. अशाच प्रकारचे धोरण पूर्वी अल-कायदा ही दहशतवादी संघटनाही वापरत होती. त्याच पद्धतीने काही राजकीय पक्ष जगात काम करताहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही भाजपने आधी हेच केलेले. आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही हेच सुरू आहे. आधी पक्ष फोडला, घर फोडले आणि त्यातूनही हे नेते, पक्ष कोसळत नाही दिसताच त्यांचे चारित्र्यहनन करण्यास सुरुवात केली. मात्र आम्ही याला सामोरे जाऊ आणि पुन्हा उभे राहू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, त्यांनी त्यांचे राजाकारण करावे. पण उद्धव ठाकरे, शरद पवार असतानाही पक्ष आमचाच ही भूमिका भाजपची आहे. भाजपला या दोन्ही पक्षांना खतम करायचे आहे. शिंदे आणि अजित पवारांच्या माध्यमातून मराठी अस्मितेसाठी काम करणाऱ्या पक्षांना नेस्तनाबूत करायचे आहे. पण हे शक्य नाही. आम्ही या पडझडीतून उभे राहिलेले असून आमचा मार्ग विजयाच्या दिशेने सुरू आहे. 2024 ला महाराष्ट्रात आणि दिल्लीत आमचे राज्य येणार, असा पुनरुच्चारही राऊत यांनी केला.
दरम्यान, दादा भूसे यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी संजय राऊत आज मालेगावच्या कोर्टात हजर राहणार आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भूसे यांच्याकडे आम्ही फक्त हिशोब मागितला होता. गिरणा मोसन सहकारी कारखाना वाचवण्यासाठी भूसे यांनी शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले. त्या पैशांचे काय झाले? हे पैसे कोणत्या मनी लॉन्ड्रिंग मार्गाने परदेशात गेले की अन्य कुठे गेले? हे विचारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना नाही का? ते विचारल्यावर अब्रू कशी गेली? शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, लोकं रस्त्यावर उतरली म्हणून त्या हजारो लोकांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार का? असा सवाल राऊत यांनी केला.
शरद पवारांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले, अजित पवारांचा दावा
सत्तेचा गैरवापर करायचा, मुस्कटदाबी करायची असे धोरण सुरू असून मालेगावच्या कोर्टात हजर राहून भूमिका मांडणार आहे. मात्र मंत्रीमंडळामध्ये दादू भूसे यांच्यासह 100 टक्के मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांची प्रकरणं बाहेर येतील तेव्हा महाराष्ट्र हादरून जाईल, असा दावाही राऊत यांनी केला. हे सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभे आहे. भ्रष्ट, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर मार्गाने, खोके मोजून हे सरकार आले आहे. पुरावेही समोर आले असून कागदोपत्रीही पुरावे देऊ, असेही राऊत यावेळी म्हणाले.
सरकार मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना अटक करण्याची शक्यता आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. सरकार कोणालाही अटक करू शकते. जे सरकारला डोईजड होतात, कायद्याने आवरता येत नाही, त्या व्यक्तीवर सरकारी बंधने आणून त्याला अटक केली जाते. आम्हीही त्यासाठीच तुरुंगात गेलो. जरांगे-पाटील सरकारला धोकादायक वाटत असतील, पण ते त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत. त्यांची भाषा प्रखर असती, तरी सरकारने त्यांचे ऐकले पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतात, असेही राऊत म्हणाले.

























































