फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महायुती सरकारची सालटी काढली. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

”फडणवीस यांचं सरकार कॅरेक्टरलेस सरकार आहे. चारित्र्यहिन सरकार आहे. खरंतर हा शब्द महाराष्ट्रासाठी वापरायला आमची जीभ धजावत नाही. फडणवीस यांचं सरकार कॅरेक्टरलेस सरकार आहे. चारित्र्यहिन सरकार आहे. त्यांच्या कॅबिनेटमधला एक मंत्री डान्स बार चालवतो. जे आमच्या आर आर पाटलांनी बंद केले होते ते डान्स बार स्वत: तुमचा गृहराज्यमंत्री चालवतोय. तुमचा एक मंत्री सिगारेटचा धूर सोडत चड्डीवर बसलाय. एक मंत्री टॉवेलवर मारामारी करतोय. एक मंत्री विधानभवनात रमी खेळतोय. हे तुमच्या मंत्रीमंडळाचं कॅरेक्टर आहे. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करत आहेत. मंत्रीपदाचं कामाचं भन नाही. लूटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहेत. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे यांचा काय रिपोर्ट आहे. विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतायत कारण त्यांची मजबुरी आहे. तुमची काय मजबुरी आहे. तुमचे काही सिक्रेट्स पवारांकडे आहेत का? तुम्ही त्यांना का घाबरताय? देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा चारित्र्यवान माणूस असं सगळं सहन करतो हे मला धक्कादायक वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.

“हिंदी सिनेमा मराठी सिनेमाच्या बोकांडी बसतोय. मराठी निर्माते सुद्धा गुंतवणूक करतात. मराठी कलाकार मेहनत करतात. सगळ्यांची मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरवता येणार नाही. सरकार मराठीच्या बाबत गंभीर असेल तर त्यांनी असा प्रकार होऊ द्यायला नको. मराठी माणसाने सिनेसृष्टी उभी केली. त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमाची दादागिरी चालत नाही, हिंदी सिनेमाची दादागिरी चालते. ही गंभीर गोष्ट आहे”, असे संजय राऊत म्हणाले.