…म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली, फडणवीसांच्या टिकेला संजय राऊत यांचे सणसणीत प्रत्युत्तर

मुंबईत संघर्ष करून आम्ही म्हातारे झालो. आमची आधीची एक पिढी स्वर्गवासी, शहीद झाली म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली, असे सणसणीत प्रत्युत्तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मुंबईत जन्माला येऊन शहराचा विकास करू शकले नाही, अशी टीका फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, मुंबईत जन्माला येऊन आम्ही म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली. तुम्ही महाराष्ट्रात राहताय. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी, शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येतेय मिस्टर फडणवीस. तुम्ही तरूण आहात. नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देत असल्याचे आम्ही बघितले, असेही राऊत म्हणाले.

फडणवीस यांच्या मी सर्टिफाईड नागपूरकर आहे, या विधानाचाही संजय राऊत यांनी समचार घेतला. तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात तर, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत. आम्ही ही मुंबई लढून मिळवली आहे. जमिनीतून बटाटे, भुईमुगाच्या शेंगा येतात तशी मुंबई मिळालेली नाही. ही मुंबई लढून मिळवली. जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता. त्यामुळे गब्बर सारखा डायलॉग मारायला काय जाते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

सत्तास्थापनेसाठी वैचारिक सुंता; काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांवर रवींद्र चव्हाणांनी ससाण्यासारखी झडप घातली! – संजय राऊत

कोण लूजर आहे, कोण विनर आहे हे मुंबईची जनता ठरवेल. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे. मुंबईची जनता ही कायम ठाकरेंच्या मागे उभी राहिलीय हे देवेंद्र फडणवीस यांनाही चांगले माहिती आहे. ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा आहे, असेही राऊत म्हणाले.