… तर शिवसेना चाल करून जाईल; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजय राऊत आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक रिंग रोड व एमआयडीसी भूसंपादन विरोधात नाशिकातील शेतकरी गोदावरी तिरावरील रामकुंड परिसरात साखळी उपोषण करत आहे. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आज रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली जमिनींची कागदपत्रे संजय राऊत यांच्याकडे दिली. शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची संजय राऊत यांनी सविस्तर उत्तरे दिले.

महिनाभरापूर्वी भूसंपादनाच्या याच प्रश्नावर आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडल्याची आठवण संजय राऊत यांनी यावेळी करून दिली. ‘भूसंपादनाच्या या प्रश्नासाठी महिनाभर आधी मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो होतो. रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा विरोध असून जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. सकाळी घरात घुसून शेतकऱ्यांना, वृद्ध महिलांना मारहाण केली. मी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही गेलो होतो तेव्हा महसूल मंत्री बावनकुळे, तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं होतं की जबरदस्तीने असा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. तरीही आज मी पाहिलं की हे सगळे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. एका बाजूला तुम्ही कैवारी म्हणून शेतकऱ्यांना ५० हजार कर्ज माफी देत असल्याचे सांगत आहात आणि दुसऱ्या बाजूला जमिनी काढून घेतल्या. कुणासाठी तर बिल्डरांसाठी?’, असा सवाल त्यांनी केला.

‘भाजपला देणग्या देणारे हे लोक आहे. त्याभागात ज्यांनी जमिनी खरेदी केली ते आयएसआय आणि आयपीएस अधिकारी त्यांच्या जमिनींना भाव मिळावा म्हणून हा रिंग रोडचा घाट खातलेला आहे का?’, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आपल्या हातात शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवत, ‘माझ्याकडे संपूर्ण यादी आहे. आता मी यादीतील नावे वाचली तर भूकंप होईल. राज्यातील बडे अधिकारी आहेत त्यांनी चाळीस चाळीस एकर जमिनी घेतल्या आहेत. त्यामुळेच आपण नाव घेतलं तर भूकंप होईल’, असं राऊत म्हणाले.

‘मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिल होतं की मी यात लक्ष घालेन. त्यांनी तसं केलं नसेल तर मी त्यांना पुन्हा एकदा स्वत: भेटेन. तरीही नाही ऐकलं, नाही झालं, तर ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईन’, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

‘माझ्याकडे नावे आहेत, ती नावे मी मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना देणार की तुम्ही यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेताहेत का? हे शेतकऱ्यांचे सरकार आहे का? शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेत आहात, पण तुमच्या लाडक्या बहिणी देखील त्या घरात आहेत. त्यांना तुम्ही निराधार करताहेत, हे चालणार नाही’, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. ‘अधिकाऱ्यांच्या घरात घुसू, बघू तुम्हाला कोण संरक्षण देतं’, असंही ते म्हणाले.

लाडकी बहीण ते कर्जमाफी, फडणवीस-मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक; संजय राऊत यांचा घणाघात

नाशिकमध्ये शेतकरी मंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करत आहेत, त्यांच्या गाड्या अडवत आहेत, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, ‘आंदोलन व्हायलाच पाहिजे. हे सरकार निर्ढावलेलं आहे, त्या मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याच पाहिजे. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला, राजकारण करायला वेळ आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांचे ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही, राज्य करताहेत कशाला? कुणासाठी करताहात? तुमच्या मुलाबाळांसाठी का?’, असे खरमरीत प्रश्न त्यांनी सरकारला विचारले.

यावेळी संजय राऊत यांनी रामकुंडावरील गोदावरी नदीची परिस्थिती पाहिली. त्यावर बोलताना ‘गोदावरी नदीची अवस्था पहा, तिकडे गंगेची अवस्था पहा. हजारो कोटी खर्च करूनही अशी अवस्था आहे. या सरकारच्या विरोधात आंदोलनकरून देखील काही होत नाही. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला आणून या गटार गंगेत बुडवायला पाहिजे’, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.