
पाकिस्तानात ‘अल्ला, आर्मी आणि अमेरिका’ असे तीन ‘ए’ देश चालवतात. तर हिंदुस्थानात ‘सीबीआय, आयटी आणि ईडी’ देश चालवतात. त्यामुळे आमचे सरकार आल्यास मोदी, शहा आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज लगावला.
सरकारच्या माध्यमातून सध्या ‘ईडी, सीबीआय आणि आयटी’ आडून सुडाचे राजकारण सुरू आहे. सरकारच्या विरोधात कुणी बोलल्यास लगेच याचा वापर केला जातो. मात्र यातून हाती काहीच लागत नाही. गेल्या काळात तब्बल 16 हजार प्रकरणांत केवळ 15 गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यामुळे ‘ईडी, सीबीआय आणि आयटी’चा वापर केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे. तामीळनाडून एका मंत्र्याला ईडीने फरफटत नेल्यावर त्यांना रडू कोसळले. यावेळी तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही ईडीला सांगितले आमच्या नादाला लागू नका, पळता भुई थोडी होईल. आम्हीही घाबरत नाही. त्यामुळे आम्हाला आता ढाल, नको तर तलवारच हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगाके पुरा देश डुबाने’ असा टोला हाणतानाच मोदी-शहा यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक भांडण नसून आमचे भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी असल्याचे ते म्हणाले. 2024च्या निवडणुकीत आपल्याला देश ताब्यात घ्यायचा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची लूट सुरू आहे
भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्राची लूट, भ्रष्टाचार सुरू असल्याचे राऊत म्हणाले. नोटा बनवण्याच्या कारखान्यातून तब्बल 88 हजारांच्या नोटा गायब कशा झाल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले जातात. मिंध्यांच्या जाहिरातबाजीवर सडकून टीका करताना ‘हे वाघाचे कातडे घातलेले लांडगे असल्याचा टोला त्यांनी लगावला. मिंध्यांना शिवसेनेचा वर्धापन दिनही माहीत नसल्याचे स्पष्ट करताना खरे वाघ आपल्यासमोर बसले असल्याचे ते म्हणाले.


























































