सत्तास्थापनेसाठी वैचारिक सुंता; काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांवर रवींद्र चव्हाणांनी ससाण्यासारखी झडप घातली! – संजय राऊत

भारतीय जनता पक्ष किती बंचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसले. भाजप बरोबर आघाडी केल्याने काँग्रेसने त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले. काँग्रेसने निलंबित करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर ससाण्यासारखी झडप घातली. ती काँग्रेसच्या विचारांची लोक असून त्यांना काँग्रेसने पक्षातून काढताच तुम्ही त्यांनाच घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता. याला सत्तास्थापनेसाठी केलेली वैचारिक सुंता म्हणतात, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली.

अंबरनाथमध्ये शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, अंतर्गत लाथाळ्या आहेत. पण तुम्ही काँग्रेस बरोबर युती केली. एमआयएमला बरोबर घेऊन अकोटमध्ये स्थापन करत आहात. हे एक नंबरचे बंचुके आणि ढोंगी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला. राज्य गढूळ केले, असेही राऊत म्हणाले.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण हे जे संतांनी म्हटले ते भाजपच्या बाबतीच तंतोतंत लागू पडते. आम्ही वारंवार म्हणतोय की, काँग्रेस नसेल तर भाजपा नाही. शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते, कार्यकर्ते घडले जात होते. आता ते पळवले जातात आणि पक्ष उभे केले जातात. स्वत:च्या पक्षात नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ते घडवण्याची अजिबात क्षमता नसल्याने, स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे चोऱ्या-माऱ्या, लांड्या-लबाड्या करून लोकांना पक्षात सामील करून घेतले जात आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच हा प्रकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यात घडला. त्यांना हे कळू नये की यामागे त्यांचेच कारस्थान होते? असा सवालही राऊत यांनी केला.

परळीमध्ये मिंधे गटाने एमआयएमसोबत हातमिळवणी केली आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तुमच्या सरकारमध्ये धर्मांध, राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे एमआयएम, काँग्रेस बरोबर बसतात. शिंदे, भाजपला काँग्रेसचा प्रचंड तिटकारा होता. आता तुम्ही काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावून बसताय आणि एमआयएमच्या लोकांना मांडीवर घेताय, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाली की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहेत, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही हे मिंधे म्हणत होते. मग आता काय? तुमचा मित्रपक्ष काँग्रेस बरोबर आहे. तुम्ही बीडमध्ये एमआयएमबरोबर युती करताय. कशाला लोकांना फसवता. सत्तास्थापनेसाठी केलेली ही वैचारिक सुंता केली आहे, असेही राऊत म्हणाले.

भाजप पाठोपाठ शिंदे गटाचे एमआयएमशी ‘गॅटमॅट’, परळी नगरपालिकेत युती, मुबारक म्हणत दानवेंनी मिध्यांना डिवचलं

ते पुढे म्हणाले की, आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत. शरद पवारांची राष्ट्रवादी काही ठिकाणी आमच्याबरोबर आहे. आम्ही काँग्रेस बरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि त्या सरकारमध्ये शिंदे, त्यांच्याबरोबरची टोळीही सामील होती. तेही सत्तेचे भोग घेतच होते. बराच काळ लाभ घेतला आणि त्यातूनच 50-50 खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली. आमदारांना 2 हजार कोटी वाटले. त्यांनी पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या सरकारमध्ये बसणार नाही, ही भूमिका का घेतली नाही? अडीच वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली? असा सवालही संजय राऊत यांनी केला.