
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता आणि ज्याला अटकही झाली होती, अशा व्यक्तीला निर्दोषत्व सिद्ध होण्यापूर्वीच राजकीय बक्षीस दिले जात आहे. त्याच्या तुम्हाला लाजा वाटत नाही का ? एवढं धाडस यांच्याकडे येतं कुठून? असा संतप्त सवाल राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
संजय राऊत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले, त्यावर संजय राऊत म्हणाले, भाजपला वाटतं जनता मुर्ख आहे. त्यांनी केलेल्या सर्व पाप कर्मांना जनता मान्यता देईल आणि इथे सुद्धा हम करे सो कायदा मान्य केला जाईल. भाजपची माघार घेण्याची या आठवड्यातील ही तिसरी वेळ आहे. एमआयएमसोबत जेव्हा त्यांनी युती केली आणि जेव्हा गोंधळ झाला तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही युती आमची नाही हे मान्य करणार नाही हे त्यांना सांगावे लागलं. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली तेव्हाही गोंधळ झाला. टीका झाली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन सांगावं लागलं, ही युती आम्हाला मान्य नाही. तरीही बिनधास्तपणे निर्लज्जपणे अंबरनाथ, बदलापूर लैंगिक अत्याचारातील एक संशयीत आरोपी आपटे यांच्याविरोधात त्या भागात खूप मोठा रोष निर्माण झाला होता. ज्यांना अटक झाली होती. त्यांना तुम्ही निर्दोषत्न सिद्ध न होता त्यांना तुम्ही अंबरनाथ नगरपालिकेचे स्विकृत्व सदस्य करतात. एवढं धाडस यांच्याकडे येतं कुठून? हे सगळं संपलं की मी यावर संशोधन करणार आहे. भाजपमध्ये, त्यांच्या लोकांमध्ये एवढं धाडस येतं कुठून हे संशोधन करण्यासारखे आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाट उसळली अशा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत सदस्य करतात त्याच्या तुम्हाला लाजा वाटत नाही का ? ते असतील संघाचे कार्यकर्ते त्यांनी केली असेल या निवडणुकीचत भाजपला मदत. त्याबद्दल तुम्ही त्यांना बक्षिसं देतात. म्हणजे उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे बलात्काराच्या आरोपींना पाठिशी घालण्याचे प्रकार घडले, तसाच निर्लज्जपणा आता महाराष्ट्रातही पाहायला मिळत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्राचे तुम्ही काय करुन ठेवले आहे. हे घडते आहे त्याचे कारण भाजपची किंवा फडणवीसांची जी काही माणसं आहेत ती मोकाट सुटलेली आहेत. आम्ही काही केलं तरी आपला ‘बॉस’ वर्षा बंगल्यावर बसला असून तो आपल्याला नक्कीच पाठिशी घालेल, असा विश्वास सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे आणि त्यातूनच अशा प्रकारची धाडसी कृत्ये केली जात आहेत, असे राऊत यांनी नमूद केले. “महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?” याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी करत राऊत यांनी या नियुक्तीचा तीव्र निषेध केला.



























































