मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा! संजय राऊत यांचे तुफानी भाषण

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिवतीर्थावरील दसरा मेळावा भर पावसात उत्साहात साजरा झाला. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांचे तुफानी भाषण झाले. आज रावणाचा अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचा की रावणाला बुडवायचा? हा विचार करावा लागेल. मुंबईत पाऊस आहे, या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला.

भर पावसात, चिखलात या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक, असे संजय राऊत यांनी म्हणताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज आपल्याकडे लक्ष आहे. ६८ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची जी ठिणगी टाकली त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसात सुद्धा विझू शकत नाही. हे हा संपूर्ण देश पाहतो आहे. आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा. इथे पाऊस, वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करतो आहोत आणि हजारोंच्या संख्यने आपण इथे जमलेलो आहोत. हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलिकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलच मानायला पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेनाप्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी कितीही केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात. आज अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या शिवतीर्थावर चिखल झालेला आहे, म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार? मी म्हटलंय होय. गद्दारांवर चिखलफेकच करणार, त्यांची तीच लायकी आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे. आठ-आठ दिवस शेतकरी चिखलात आहे, आपण दोन तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर, हा आमचा ओला दसरा मेळावा आहे, असे संजय राऊत म्हणाले. रावणाचा आज अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचा की रावणाला बुडवायचा? हा विचार करावा लागेल. मुंबईत पाऊस आहे, या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

माननीय उद्धवसाहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. मला विचारलं, गद्दारांच्या मेळाव्यात ते काय पूजणार? मी म्हणालो, त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असूच शकत नाही. मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहांचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहांच्या चप्पला आणलेल्या आहेत. जोडे आणलेले आहेत ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत. आणि त्यांचं पूजन ते करणार आहे. आम्ही शस्त्रपूजा केली आणि विचारांची पूजा करतो. हे अमित शहांच्या पादुकांची पूजा करताहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. आणि आमची निष्ठा कशी? हम छोटे-छोटे फायदे के जमीर का सौदा नही करते, हम छोटे-छोटे फायदे के जमीर का सौदा नही करते, हमारी खून की आखरी बूंद उद्धवजी आपके दामनपर होगी… आपके दामनपर होगी, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे व्होटचोरीतून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्रात व्होटचोरी, लोकसभेला व्होटचोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घडाळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या या लोकांनी केल्या आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. ही लढाई मोठी आहे. ही लढाई मुंबईची आहे, महाराष्ट्राची आहे, दिल्लीची आहे. आपल्याला माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहायचं आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.