फक्त राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही, त्यांच्या बरोबर मराठी माणसांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत – संजय राऊत

शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पनवेलमध्ये खांदा कॉलनी येथील गुरुद्वाराशेजारील पोलीस मैदानावर ‘शेकाप’चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संबोधित केले. यावेळी संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. नरेंद्र मोदींनी अंबानीला देश विकला. लाडक्या उद्योगपतीना अख्खी मुंबई विकली. आणि हे लोण आता नवी मुंबई, तिसरी मुंबईपर्यंत आलेलं आहे. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. हा महाराष्ट्र अदानी, अंबानीने निर्माण केलेला नाही, हा महाराष्ट्र फडणवीसांच्या पूर्वजांनी निर्माण केला नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी यावेळी केला.

“शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेला संघर्ष केलेल्याशिवाय काही मिळालंच नाही”

शेतकरी कामगार पक्षाच्या आजच्या मेळाव्याला या मंचावर जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित आहेत. शशिकांत शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे येऊन गेले. शिवसेना आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे जमलेले आहेत. जयंतराव पाटलांना एवढचं सांगेत आम्ही सगळे इथे आलेलो आहोत ही शेकापची पुण्याई आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीत गेल्या 78 वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी यांच्या संदर्भात तुमच्या पक्षाने घेतलेल्या भूमिका आणि संघर्ष केला. दोन पक्ष या महाराष्ट्रात आहेत. एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना त्यांना संघर्ष केलेल्याशिवाय काही मिळालंच नाही. आमच्या वाट्याला सतत संघर्ष आहे. असं वाटतंय आता कुठे बरे दिवस येताहेत की कोणीतरी मधे येतं आणि तुकडे करून जातं. त्या मानाने शरद पवारसाहेबांचा पक्ष हा तसा पहिल्यापासून मोठे-मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिल्ह्या-जिल्ह्यात तुम्हाला लाभले. आणि तुम्ही टिकून राहिलात. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेतील कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके. आणि या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले, असे संजय राऊत म्हणाले.

“राज्यात शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात”

इथे जे फोटो लावले आहेत, एकेकाळी हे आमचे हिरो होते. आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणात, समाजकारणात शिकलो त्यामध्ये ‘शेकाप’ने निर्माण केलेले हे नेतृत्व आहे. केशवराव धोंडगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, भाऊसाहेब राऊत ही नावं घ्या… एकेकाळी महाराष्ट्राचं नेतृत्व या लोकांनी केलेलं. हा शेतकरी कामगार पक्ष आहे. महाराष्ट्राला यशवंतराव मोहिते यांच्या रुपात उत्तम अर्थमंत्री दिला ही शेकापची देणगी आहे. आज या राज्यात शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहे. हा महाराष्ट्र गौतम अदानीने निर्माण नाही केला. हा महाराष्ट्र अंबानीने निर्माण केलेला नाही. हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला नाही. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यात हा बावटा सगळ्यात पुढे होता. हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यात होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणी नव्हते. महाराष्ट्राच्या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड एन. डी. पाटील, अहिल्या रांगडेकर किती नावं घ्यायची. अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा सगळ्यांबरोबर महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता. म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका; राज ठाकरे यांचे तमाम मराठी जनांना आवाहन

“आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय”

माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे. मी रायगड जिल्ह्यातला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रूजला त्या जिल्ह्यात माझा जन्म झाला. त्या तालुक्यात माझं शिक्षण झालं. अजूनही मी त्या गावाला जातो. आणि मी जन्मापासून पाहतोय शेतकरी कामगार पक्ष त्यांचे कार्यकर्ते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी माहिती घेत असतो की, तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललं आहे? हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील. आणि आजच्या सरकारला तेच नको आहे. आपण लढणारे आहोत. शेतकरी लढतो, कामगार लढतो, तो जिवाची पर्वा करत नाही, तो स्वाभिमानी आहे. पण आज गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतोय आपण? शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय, बोलतोय. विधानसभेत, लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

“सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल”

लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारचा कायदा आणला आहे. तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही सामाजिक आंदोलनात उतरलात, सरकारला प्रश्न विचारलात की, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल. अर्बन नक्षलवाद, काय असतो अर्बन नक्षलवाद? आज खेड्यापाड्यांवर, आदिवासी पाड्यांवर, जंगलात काम करणारा कार्यकर्ता कॉम्रेड आहे. तो हातात लाल बावटा घेऊन काम करतो. झारखंड, छत्तीसगडमध्ये जाऊन मी पाहिलं आहे. त्यांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणून तुरुंगात टाकणार? उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते. तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. तुम्हा कामगारांचे प्रश्न उचलताय, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. पण नरेंद्र मोदींनी अंबानीला देश विकला. लाडक्या उद्योगपतीना अख्खी मुंबई विकली. आणि हे लोण आता नवी मुंबई, तिसरी मुंबईपर्यंत आलेलं आहे. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“मराठी माणसांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत तर, या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील”

आपल्यातल्या लढण्याचा जो बाणा आहे तो आपल्याला संपवता कामा नये. या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे. यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला. पण फक्त राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही. त्यांच्याबरोबर मराठी माणसांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत तर, या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील. अनेक प्रश्न या महाराष्ट्रात आहेत. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत यश मिळालं नाही. शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यश मोठे प्रमाणात मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही, त्या मागची कारणं वेगळी आहेत. पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. त्याला या महाराष्ट्राचा मराठी बाणा आणि मराठी माणसाचा लढय्या बाणा म्हणतात. खचून कसले जाताय? निवडणुका आज येतील, उद्या परत जातात. पण आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर कसून उभं रहावं लागेल. आणि आजच्या या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्त्व हेच आहे. मी दिल्लीत 25 वर्षे आहे. आजही महाराष्ट्राचा रूबाब दिल्लीमध्ये आहे. आजही मराठी, मराठी खासदार म्हटला की लोकं दचकतात. त्याचं कारण हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. हा महाराष्ट्र कधी झुकला नाही, हा महाराष्ट्र कधी वाकला नाही. आणि खास करून जे रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे रायगड जिल्हा म्हणजे काय आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

“आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक, मराठी हा आपला आत्मा”

आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय. जो सन्माननीय राज ठाकरेसाहेबांनी सांगितला. जस जसे उद्योग वाढताहेत, औद्योगिकरण होतंय, तशी आपल्या शेतकऱ्याची पिछेहाट होतेय. कामगार वर्ग बाहेरून येतोय. मराठी संस्कृतीवरती अतिक्रमण होतंय. यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे. जयंतभाई शिवसेनेची आणि आपली विचारसरणी एक आहे. आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत. मराठी हा आपला आत्मा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा महाराष्ट्रातला महत्त्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण, उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे. आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारायला पाहिजे. आम्ही सगळे एका नात्याने आपल्या बरोबर जोडलेलो आहोत. महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील, मराठी माणूस राहील. आणि महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल. हे सेनापती बापट यांनी सांगितलेलं आहे. मला त्याची या क्षणी आठवतोय. आज आपण मोठ्या संख्येने जमलेले आहात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजाचं, शाहू, फुले, आंबेडकरांचं आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि आपल्या या राज्यामध्ये जातीय धर्मांध शक्तिंना कोणत्याही प्रकारचा थारा न देता हे राज्य मजबुतीने पुढे नेलं पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.