फडणवीसांना सुबुद्धीचे अजीर्ण झाले आहे! संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धीचे अजीर्ण झाले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज लगावला. बरेचसे नागपूरकर हल्ली मुंबईला असतात, त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला, अशी कोपरखळीही त्यांनी फडणवीसांना मारली.

शिवसंपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत रात्री नागपुरात दाखल झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊत वारंवार नागपूरला आले तर त्यांना थोडी सुबुद्धी मिळेल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, फडणवीस बरोबर बोलले आहेत. त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झाले आहे. त्यातील थोडी सुबुद्धी जर त्यांच्या महाराष्ट्रातील लोकांना मिळाली तर महाराष्ट्र शांत राहील!

दिल्लीतील दंगे कोणी भडकवले हे देशाला माहीत आहे. देशातील वातावरण खराब करण्याचे प्रयत्न चांगले नाहीत. देशाच्या ऐक्यासाठी ते योग्य नाही, असेही खासदार राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे भक्कम सरकार आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ज्या शिवसेनेने हिंदुत्वासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्या शिवसेनेच्या राज्यात हिंदूंना टार्गेट केले जात आहे असे कोणी म्हणत असेल तर तो या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे, असेही खासदार राऊत यांनी विरोधकांना सुनावले.