
मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यालयांना खंडणीखोर केले आहे. खंडणी जमा करण्याची भाजपची साधने आहेत. मुंबई व महाराष्ट्रात क्रिमिनल सिंडिकेट सुरू आहे. पुढील आठवडय़ात शिवसेना भवनात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढण्याची घोषणा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे दररोज एक प्रकरण बाहेर काढण्याचा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी धडाका लावला आहे. आज त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आणखीन एक प्रकरण बाहेर काढले.
ट्विटमध्ये काय म्हटलेय
किरीट, आपण हे सांगू शकाल का, वेदूर (पालघर) येथील निरव डेव्हलपरमध्ये 260 कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? येथे निकॉन ग्रीन व्हिलेज या प्रकल्पात मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का? यात ईडीच्या कोणत्या जॉइंट डायरेक्टरची बेनामी गुंतवणूक आहे ? महाराष्ट्राला कळू द्या, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
लवकरच ईडीच्या कार्यालयावर
ईडीच्या कार्यालयात आम्ही लाखो लोकं लवकरच जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच-पंचवीस हजारांची चौकशी करीत आहात. तुम्ही हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले, कसा भ्रष्टाचार केला हे दाखवून तुम्हाला उघडे पाडून बाहेर काढणार आहोत.
महाराष्ट्रात आमचे सरकार आहे
दररोज कुंडल्या बाहेर काढण्याची धमकी किरीट सोमय्या देत आहेत. त्याचा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले की, कुंडल्या काढण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. तुमच्याही कुंडल्या आमच्याकडे आहेत. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या पहाव्या लागणार आहेत. तुमचे केंद्र सरकार असेल, पण हे महाराष्ट्र सरकार आहे आणि आमच्या हातातही बरेच काही आहे. तेव्हा उगाच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका. त्यात तुम्हीच फसणार आहात, असा इशारा त्यांनी दिला.
रिश्ते में हम आपके बाप है
तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशेब तुम्हीच करीत बसा. ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स तुम्ही आमच्या मागे लावा. आम्ही घाबरत नाही. तुम्ही किती धमक्या दिल्या तरी ‘रिश्ते में हम आपके बाप लगते है’ आणि ‘बाप’ काय असतो. ते तुम्हाला यापुढे रोज दिसेल. आम्ही कोणाला टार्गेट करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तोंड काळे करून जावे लागेल
मुंबईत व महाराष्ट्रात ईडीचे क्रिमिनल सिंडिकेट चालू आहे. हे पूर्णपणे उघडे केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कोणाला आमच्या अंगावर यायचे असेल तर त्यांनी जरूर यावे. एक दिवस तुम्हाला तुमचे तोंड काळे करून जावे लागेल. आमच्याकडे भरपूर साठा आहे. हे सर्व ट्रकमध्ये भरून आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणार आहोत. ज्या दिवशी आम्ही जाऊ तेव्हा ते ईडीचे कार्यालय बंद करून जातील, असा इशारा त्यांनी दिला.
विरोधकांना ठोकायला मुख्यमंत्री सक्षम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केले होते. त्याचा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी जोरदार शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम व ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते बाहेर कार्यक्रमांना जात आहेत. माणसाचे आजारपण सांगून येत नाही आणि जे आरोप करीत आहेत त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांच्या मुलाबाळांची चांगल्या मार्गाने भरभराट होवो. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा. आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचे नेतृत्व करायला ते सक्षम आहेत आणि तुम्हाला ठोकायलाही सक्षम आहेत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी हाणला.































































