
महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”वसतीगृहासाठी वाटेल तितके मगा. पाच दहा, पंधरा कोटी निधी मगा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? असं मुजोर वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे.
राज्यातील मंत्र्याचे कारनामे सध्या राज्यभरात गाजतआहेत. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमीचा डाव, विधानभवनातील आमदार समर्थकांची हाणामारी, आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन चालकाला मारहाण ही प्रकरण सध्या गाजत आहेत. यावरुन सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे. यात आता आणखी एका प्रकरणाची भर झाली आहे.
अकोल्यातील निमवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले.यावेळी भाषण करताना शिरसाट म्हणाले की, आपल्या भागातील वसतिगृहांसाठी निधी मागा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?.’असे शिरसाट म्हणाले.