यंदा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव ‘ऑनलाइन’

प्रतिष्ठेचा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव यंदा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील पदवीदान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. संगीतप्रेमींना 10 एप्रिल ते 1 मे यादरम्यान दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ऑनलाइन पद्धतीने महोत्सवात सहभागी होता येईल. महोत्सवात पंडित शिवकुमार शर्मा, राधिका सूद नायक, उस्ताद फझल कुरेशी, अश्विनी भिडे-देशपांडे हे कलाकार सहभागी होणार आहेत.

द इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई संस्कृती संगीत महोत्सव पार पडत आहे. मुंबईचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. पूर्वी हा महोत्सव बाणगंगा तलावाच्या काठी ‘बाणगंगा महोत्सव’ नावाने व्हायचा. मात्र ध्वनिप्रदूषणाच्या कारणास्तव उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा सोहळा ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायऱयांवर हा महोत्सव साजरा होतो.

महोत्सवाचे नाव बदलून ‘मुंबई संस्कृती’ असे ठेवण्यात आले. या वर्षी कोरोनाचे संकट बघता प्रथमच ‘मुंबई संस्कृती महोत्सव’ ऑनलाइन होत आहे. या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण संगीतप्रेमींना www.Youtube.com/IndianHeritageSocietyMumbai या यू टय़ूब चॅनेलवर बघता येईल.

10 एप्रिल रोजी पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रम झाला. 17 एप्रिल रोजी सुफी गायिका राधिका सूद-नायक यांची मैफल होईल, तर 24 एप्रिल रोजी उस्ताद फझल कुरेशी यांचे तबला वादन होईल. 1 मे रोजी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाचा आनंद घेता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या